प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात; छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 07:24 PM2019-12-03T19:24:49+5:302019-12-03T20:07:40+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

Shiv Pratap Day was celebrated with enthusiasm at Pratapgad. | प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात; छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात; छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Next

सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, तुताऱ्यांचा आवाज अन् अंगावर शहारे आणणारे शिवकालीन धाडशी खेळ अशा उत्साही वातावरणात मंगळवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हा देदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील शिवप्रेमींनी प्रतापगडावर हजेरी लावली. 

प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते पूजा बांधण्यात आली. त्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते भवानी देवीची आरती करण्यात आली. भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाºया भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग-ठाकूर, वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, कोरेगाव प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी अमिता दगडे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांच्या पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण उत्साहित झाले. दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे अवकाशातून पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. याही वर्षी हेलिकॉप्टरद्वारे अवकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली. सोसाट्याचा वारा अन् ढगाळ वातावरणामुळे पुष्पवृष्टी सुमारे एक तास उशिरा झाली. सुरक्षेच्या दृष्टीने प्रतापगड व परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: Shiv Pratap Day was celebrated with enthusiasm at Pratapgad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.