शिरवळ पोलिसांनी अल्पवयीन युवतीचा विवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:45+5:302021-01-08T06:08:45+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन युवतीचा होणारा विवाह शिरवळ पोलिसांनी रोखला. या घटनेमुळे संपूर्ण खंडाळा तालुक्यात खळबळ ...

शिरवळ पोलिसांनी अल्पवयीन युवतीचा विवाह रोखला
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन युवतीचा होणारा विवाह शिरवळ पोलिसांनी रोखला. या घटनेमुळे संपूर्ण खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील १६ वर्षीय एका अल्पवयीन युवतीचे लग्न सोलापूर जिल्ह्यातील एका २२ वर्षीय युवकाशी शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमधील एका गावात नातेवाईकांच्या घरासमोर गुरुवार, दि. ७ रोजी करण्याचे ठरविले होते. लग्नाची तयारी संबंधित ठिकाणी जोरदार करण्यात आली होती.
यावेळी लग्नाची तयारी सुरू असताना संबंधित लग्न समारंभातील नियोजित वधू ही अल्पवयीन असून, तिचे वय अवघे १६ वर्षे असल्याची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई व पोलीस हवालदार नितीन महांगरे, महिला पोलीस हवालदार सुप्रिया जगदाळे यांना याबाबतच्या सूचना देत तातडीने लग्नसमारंभ ठिकाणी जाण्यास सांगितले. वधू-वरावर अक्षदा पडण्याची वेळ जवळ आली असताना, शिरवळ पोलिसांनी मंडपात दाखल होत संबंधित वधूची चौकशी करीत वयाचा पुरावा पाहिला. यावेळी संबंधित वधू ही सोळा वर्षाची असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, शिरवळ पोलिसांनी दोन्हीकडील नातेवाईकांचे समुपदेशन केल्यानंतर विवाह समारंभ हा युवतीचे वय कायद्याप्रमाणे पूर्ण झाल्यानंतर करण्याचे नातेवाईकांनी कबूल केले.
यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनला दोन्ही बाजूकडील नातेवाईकांनी गर्दी केल्याने शिरवळ पोलीस स्टेशन आवारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिरवळ पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर नातेवाईकांनी सुस्कारा सोडला.