शिरवळ-बारामती चौपदरीकरण रखडले
By Admin | Updated: August 3, 2014 22:45 IST2014-08-03T21:45:21+5:302014-08-03T22:45:40+5:30
पाच वर्षांपासून प्रतीक्षा : अपुऱ्या कामामुळे शिरवळ-लोणंद रस्ता बनला मृत्यूचा सापळा

शिरवळ-बारामती चौपदरीकरण रखडले
लोणंद : शिरवळ-बारामती चारपदरीकरणाचे काम पाच वर्षांपासून रखडले असून, याच रस्त्याचा एक भाग असणारा लोणंद-शिरवळा रस्ता अपुऱ्या कामामुळे अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याचे काम कधी पूर्ण करणार व सत्ताधारी व विरोधक पाच वर्षांपासून रखडलेले कामाकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न नागरिकांना व प्रवाशांना पडला आहे.
‘बांधा-वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर शासनाने शिरवळ-बारामती चारपदरीकरणाचे काम आयव्हीआरसीएल या कंपनीस दिले असून, कामाच्या सुरुवातीपासून सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने या कंपीनने या कामास सुरुवात केली. बहुतेक रस्त्याचे काम पूर्ण करूनदेखील शासनाने या रस्त्यात जाणाऱ्या शेतजमिनीचे संपादन खंडाळा तालुक्यात केले आहे. संपादन प्रक्रियाच योग्य वेळेत झाली नसल्याने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील रस्ता पूर्ण झालेल्या अनेक ठिकाणी मिळाली नसून कंपनीने मात्र रस्त्याचे काम केले आहे.
या रस्त्यामध्ये जाणाऱ्या घरासाठी व शेतजमिनीसाठी शासन कवडीमोल मोबदला देत असून, आम्हाला एक लाख रुपये गुंठा या दराप्रमाणे मोबदला मिळावा, अशी भूमिका खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली घेऊन या कामास विरोध करत रस्ता रोको करून चारपदरीचे काम बंद पाडले होते. यानंतर मात्र, सत्ताधाऱ्यांनी काही जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या कामाकडे व या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले व त्यानंतर या रस्त्याचे काम खऱ्याअर्थाने रेंगाळले असून आज या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.
या कंपनीने वीर धरण ते लोणंदपर्यंत अनेक ठिकाणी मुख्य रस्ता उचकटून टाकला असून, अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजू तीन-चार फूट खोदल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी वाहतुकीस पर्यायी रस्ता नसल्यामुळे व मुख्य रस्ता उचकटून टाकल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून, अनेकांना नाहक आपला जीव या रस्त्यापायी गमवावा लागला आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली या रस्त्याचे काम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बंद पाडल्यामुळे दोन्ही काँग्रेसचे नेते या प्रश्नाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असून, शिवसेना सोडल्यामुळे पुरुषोत्तम जाधवदेखील याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत असून कायदेशीर मार्गाने त्याचा लढा सुरू आहे.
जिल्हास्तरीय नेते मात्र हा प्रश्न कसलाच गांभीर्याने घेत नसून, या रस्त्यामध्ये शेतजमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांची रामराजेंनी एक बैठक घेतली होती. मात्र, नुकसानग्रस्ताचा आक्रमकपणा त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनीदेखील याकडे दुर्लक्ष केल्याचे लोकांमधून बोलले जात आहे.
दोन्ही काँग्रेसने या रस्त्याच्या चारपदरीकरणाच्या कामास राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला असून, त्यामुळे रस्त्याचे काम करणाऱ्या आयव्हीआरसीएल कंपनीचीदेखील गोची झाली असून, आयव्ही आरसीएलने देखील काम करताना फलटण-बारामतीला एक न्याय व खंडाळ्याला एक न्याय दिला असून, अत्यंत चुकीच्या पद्धतीने या रस्त्याचे काम केले असून, ही कंपनी या रस्त्याचे काम कधी पूर्ण करणार, या कामात जाणाऱ्या शेतजमीन संपादन महसूल विभाग कधी करणार व या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, म्हणून खंडाळा तालुक्यातील लोकप्रतिनिधी प्रयत्न कधी करणार, अशी चर्चा वाहनधारकांमध्ये व नागरिकांमध्ये होत आहे. (वार्ताहर)