कड्याखालील शिंदोळा गावाकडे कानाडोळा
By Admin | Updated: September 18, 2014 23:23 IST2014-09-18T22:34:07+5:302014-09-18T23:23:53+5:30
गावातील विद्यार्थ्यांना ये-जा करताना धोकादायक कड्यावरून जावे लागते. रुग्णांनाही याच रस्त्याने डालग्यात घालून न्यावे लागते.

कड्याखालील शिंदोळा गावाकडे कानाडोळा
महाबळेश्वर : ‘माळीण’च्या भयावह आठवणी ताज्या असतानाच त्याचधर्तीवर धोकादायक कड्याखाली असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील शिंदोळा गावाला मात्र सर्व्हेक्षण यादीतून वगळून त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
शिंदोळा हे गाव कड्याकपारीत वसले आहे. पावसाळ्यात याठिकाणी कड्यांचे दगड सुटून गावाला धोका निर्माण झाला आहे. निसरड्या पायवाटेवरून चालताना पाय घसरून खाली पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील विद्यार्थ्यांना ये-जा करताना धोकादायक कड्यावरून जावे लागते. रुग्णांनाही याच रस्त्याने डालग्यात घालून न्यावे लागते.
नुकतेच धोकादायक गावांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणा शिंदोळा गावाचा नामोल्लेखही नाही. या गावाचा समावेश धोकादायक गावांच्या यादीत करावा, असे पत्र भेकवलीचे सरपंच व ग्रामसेवकांनी महसूल खात्याला दिले आहे. मात्र, तरीही या गावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. (प्रतिनिधी)