पवारांच्या आव्हानामुळे शिंदेंचे बिनविरोध प्रयत्न फसले
By Admin | Updated: April 27, 2015 00:19 IST2015-04-26T23:46:47+5:302015-04-27T00:19:41+5:30
शिंदेंना सतावतेय मतफुटीची भीती : ४८ पैकी ४० हून अधिक मतदार मदत करणार!

पवारांच्या आव्हानामुळे शिंदेंचे बिनविरोध प्रयत्न फसले
दत्ता पवार - कुडाळ -- जावळीत सोसायटी गटातून बिनविरोध जाण्याच्या दृष्टीने आमदार शशिकांत शिंदे यांनी ठराव प्रक्रियेपासून अधिक लक्ष घालून स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला होता. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच दीपक पवारांना सूचक, अनुमोदक मिळू नये, यासाठी मतदार सहलीवर पाठविण्यात आले. तरीदेखील दीपक पवारांच्या उमेदवारीमुळे आमदार शिंदे यांचे बिनविरोधचे स्वप्न भंगले. ही निवडणूक जरी एकतर्फी होणार, असे वाटत असले तरीदेखील मतफुटीची भीती आमदार शिंदेंना वाटत असल्यामुळे सहलीवरील मतदार आणखी काही दिवस सहलीवरच राहणार, हे निश्चित.
जावळीत आमदार शशिकांत शिंदे यांचा मोठा गट आजही कार्यरत आहे, तर तालुक्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीदेखील मजबूत पकड असल्यामुळे सर्व संस्थांवर राष्ट्रवादीचीच सत्ता आहे. एकूण ४९ मतदार जिल्हा बँकेला आहेत. त्यापैकी सोमर्डी येथील धर्मराज परामणे यांच्या निधनामुळे मतदारांची संख्या ४८ वर आली आहे.
दीपक पवारांनी जिल्हा परिषदेत विजय मिळविताना राष्ट्रवादीच्या काही मंडळींची त्यांना साथ मिळाली होती. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी चांगले मतदान घेतल्यामुळे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
त्यांना सूचक, अनुमोदक म्हणून मोरावळे, सरताळे सोसायटी मतदारांचे सहकार्य लाभल्यामुळे त्यांनी आपला निवडणुकीचा निर्णय ठाम केला. सोसायटी ठरावात आमदार शिंदे यांनी आपल्याच मर्जीतील व्यक्तींचे ठराव केल्यामुळे ४८ पैकी ४० हून अधिक मतदार त्यांनाच मदत करणार, असे बोलले जात आहे. तरीदेखील राष्ट्रवादीतीलच काही मंडळींकडून दीपक पवारांना रसद पुरविली जात आहे. तर पवार हे सहलीवरील मतदारांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत, तर काही मतदारांच्या थेट संपर्कात असल्यामुळे अशा मतदारांकडून ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ असे तर होणार नाही ना? अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आमदार शिंदेंना ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. तर दुसरीकडे दीपक पवारांनी जिल्हा बँकेत तालुक्यातील सुशिक्षितांनापेक्षा कोरेगाव तालुक्यातील अधिक सुशिक्षितानांच नोकरीची संधी मिळाली. यासह अनेक भावनिक मुद्दे घेऊन त्यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे
आमदार शिंदेंची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
सुनेत्रा शिंदेंची बंडखोरी
विद्यमान संचालिका सुनेत्रा शिंदे यांना महिला गटातून राष्ट्रवादीने डावलल्यामुळे त्यांनी आपला अर्ज कायम ठेवून बंडखोरी केली आहे. तर त्यांना राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्यांचे सहकार्य लाभत आहे. तर त्यांच्या उमेदवारीमुळे आमदार शिंदेंच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.