शिंदेंच्या ‘आपट बार’पुढे काँग्रेसची ‘लड’ फिकी!
By Admin | Updated: October 20, 2014 22:35 IST2014-10-20T21:38:55+5:302014-10-20T22:35:46+5:30
कोरेगाव : सांघिक शक्ती आणि नियोजनबध्दरित्या विजयश्री खेचून आणला

शिंदेंच्या ‘आपट बार’पुढे काँग्रेसची ‘लड’ फिकी!
साहील शहा - कोरेगाव -राज्यातील दखल घेण्याइतपत मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजनबध्दरित्या विजयश्री खेचून आणली आहे. सांघिक शक्ती एकटवली असताना देखील मताधिक्य कमी झाल्याने राष्ट्रवादीला पक्षसंघटनेबाबत ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. काँग्रेसच्या वाट्याला पराभव आला असला तरी त्यांनी मिळवलेली मते पाहता, काँग्रेसची या मतदारसंघात ताकद असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस या निवडणुकीला सामोरे जात असताना एकाकी पडल्याचे प्रकर्षाने दिसून आले. वरवर सर्वजण एकत्र असल्याचे चित्र होते, मात्र समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तो संदेश व्यवस्थित न पोहोचल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षसंघटना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता याबाबत काँग्रेसला आत्मपरिक्षण करावेच लागणार आहे.
काँग्रेसचा पारंपारिक गड असलेला कोरेगाव हा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला. १९९९ पासून २०१४ पर्यंत सलग राष्ट्रवादीने येथे विजयाचा झेंडा फडकवला आहे. पवार कुटुंबियांविषयी विशेष आस्था असलेला आणि एस काँग्रेसपासूनचा शरद पवार यांचा कार्यकर्त्यांचा संच आज देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णायक भूमिका घेत असल्याने पक्षाला येथे तोड राहिलेली नाही. सर्वच सत्तास्थाने आणि बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा आहे. जावली मतदारसंघ रद्दबातल झाल्यानंतर कोरेगावात अचानक एंट्री केलेल्या शशिकांत शिंदे २००९ च्या पहिल्याच निवडणुकीत दिग्गज डॉ. शालिनीताई पाटील या राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराचा पराभव केल्यानंतर जायंट किलर म्हणून ओळखले जाऊ लागले. जावली हा मतदारसंघ रद्द होणार याची पुरेपूर कल्पना असलेल्या शशिकांत शिंदे यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद घेऊन संपर्क वाढविलेला होता. सातारारोड येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्यात युनियनच्या माध्यमातून शिरकाव करत त्यांनी कोरेगावात दमदार पर्दापण केले होते. राष्ट्रवादी माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गोळे यांनी शक्ती पणाला लावली होती. तेथे यश मिळाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी दमदार एंट्री करत विजयश्री खेचून आणली होती.
राष्ट्रवादीची पदाधिकाऱ्यांना विशिष्ठ कार्यक्षेत्राची जबाबदारी
गेल्या साडेतीन वर्षात आमदार म्हणून आणि दीड वर्षे पालकमंत्री म्हणून शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघाचा समतोल विकास साधला. मोठ्याप्रमाणावर निधी आणून प्रत्येक वाडीवस्तीवर विकासकाम करुन दाखविले. विकासकामे करत असताना त्यांनी पक्षसंघटना अधिक मजबूत कशी होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. पक्षातील सर्वच मोठी आणि महत्वाची पदे त्यांनी मतदारसंघात आणि विशेषत कोरेगाव तालुक्यात आणत प्रत्येक कार्यकर्त्याला चार्ज करण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीश संपर्क आणि दांडगा लोकसंग्रह ही २०१४ च्या निवडणुकीतील महत्वाची शिदोरी त्यांच्याकडे होती. पक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना त्यांनी जिल़्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची जबाबदारी वाटून दिली होती. विशिष्ठ कार्यक्षेत्र दिल्याने त्यांना इतरत्र हस्तक्षेप करु न देण्याच्या चालीने त्यांना मताधिक्य मिळवून दिले. सातारा, कोरेगाव आणि खटाव या गावांनी त्यांना चांगले मतदान केले.
काँग्रेसमध्ये एकसंधतेचा अभाव
पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड.विजयराव कणसे यांनी गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी सुरु केली होती. पक्षाने संधी देऊ अगर न देऊ, अपक्ष म्हणून का होईना निवडणूक करायाची, असा चंग त्यांनी बांधला होता. निवडणूक प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात राज्यपातळीवरील दोन्ही काँग्रेसची आघाडी संपुष्टात आल्याने अॅड. कणसे यांना निवडणुकीसाठी पक्षचिन्ह त्यांच्यासाठी बोनस ठरला. पायाला भिंगरी लावत मतदारसंघ पिंजून काढला. त्यांनी कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभे केले, मात्र पक्षांतर्गत मतभेद त्यांना थोडे का होईना त्रासदायक ठरले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरेगावात विशेष लक्ष घातले आणि मतभेद मिटवून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक छत्राखाली आणले. मतदारांपर्यंत पोहोचण्यात त्यांना मर्यादा आल्या आणि त्याचा लाभ राष्ट्रवादीने अलगद उठविला.
मायनस पॉर्इंट
पंचायत समितीत सत्ता असताना देखील त्याचा फायदा घेता आला नाही.
पक्षातील संघटनात्मक पदांबाबत कार्यकर्ते नाराज.
मतदारसंघात संपर्क कमी, मोठ्या शहरांमध्ये आणि गावात संपर्क ठेवल्याने कार्यकर्ते नाराज
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची एकमुखी मूठ बांधण्यात म्हणावे असे यश नाही.
अॅड. विजयराव कणसे यांचे प्लस पॉर्इंट
काँग्रेस उमेदवारीमुळे पक्षाशी निगडीत असलेला मतदारांचे मतात परितर्वन.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी थेट संपर्क आणि त्यांच्या माध्यमातून विकासकामे खेचून आणण्यात यश.
युवक वर्गाला आकर्षित करण्यात यशस्वी. मर्यादित कालावधी असताना मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी संपर्क.
स्वत पेशाने वकील असल्याने वकिलांचे चांगले संघटन आणि मिळालेली साथ फलदायी.
आ. शशिकांत शिंदे यांचे प्लस पॉर्इंट
पाच वर्षात प्रचंड निधीची उपलब्धता आणि मतदारसंघाचा समतोल विकास.
पक्षातील सर्वच संघटनात्मक पदे मतदारसंघात ठेवण्यात यश.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदारसंघातील कार्यकर्त्यांना पदे देण्यात यशस्वी.
प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांची
विशिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी.
मायनस पॉर्इंट
कामकाजामध्ये विभागवार रचना नाही, निर्णय प्रक्रियेबाबत कार्यकर्ते नाराज.
जिल़्हा परिषदेत कोरेगाव तालुक्यातील एकाही सदस्याला संधी नाही.
पंचायत समिती ताब्यात घेण्याविषयी संधी असून देखील प्रयत्न केले नाहीत.
वाढती गर्दी फायद्याची, मात्र गरजूंची कामे होण्यास दिरंगाई, त्यामुळे नाराजी.
जिंकल्याचे कारण
दांडगा जनसंपर्क असल्यामुळे आयात नेता ही प्रतिमा बदलून टाकण्यात यश. निवडणुकीच्या आधीपासूनच मतदार संघात संपर्कास प्रारंभ.
हरल्याचे कारण
काँग्रेसचे सर्व गट विस्कळीत स्वरूपात होते. ते एकत्र आणण्यात यश आले तथापि पक्ष एकसंध आहे हे मतदारांपर्यंत पोहोचविण्यात नेत्यांना अपयश आले.