‘रामराजेंच्या व्यूहरचनेनंतर आता शिंदेंची चाल!

By Admin | Updated: April 28, 2015 23:46 IST2015-04-28T22:39:18+5:302015-04-28T23:46:03+5:30

पाठिंब्याचे सत्र : चाणक्य नीतीत आपणही अग्रेसर असल्याचे केले सिध्द --सांगा डीसीसी कोणाची ?

Shindechi move after Ramarajane configuration! | ‘रामराजेंच्या व्यूहरचनेनंतर आता शिंदेंची चाल!

‘रामराजेंच्या व्यूहरचनेनंतर आता शिंदेंची चाल!

सागर गुजर- सातारा --राष्ट्रवादीमध्ये वजनदार नेत्यांमध्ये रामराजे नाईक-निंबाळकर व लक्ष्मणराव पाटील यांचे स्थान वरचे आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सात जागा बिनविरोध करुन त्यांनी ते दाखवून दिले. मूळच्या जावळी मतदारसंघातून कोरेगावच्या सुभ्यात आपली वतनदारी भक्कम करणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे यांनीही सुनेत्रा शिंदे यांची समजूत घालून त्यांचा पक्षाला पाठिंबा घेतला. तसेच इतर दोन महत्त्वाच्या जागीही माघारीबाबत बोलणी सुरु असून शुक्रवारपर्यंत त्याला यश येईल, असे सांगितले. त्यामुळे राम-लक्ष्मणाच्या जोडीनंतर शशिकांत शिंदे यांनीही पक्षातील आपले वजन सिध्द केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता निर्विवादपणे राष्ट्रवादीकडे आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदार मंडळीच बँकेचा सत्तासोपान गाठण्यासाठी प्रयत्न करतात. तब्बल आठ वर्षांच्या कालावधीनंतर या बँकेची निवडणूक लागली.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्याच्या स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित करुन सर्वत्र रान उठविले. उदयनराजे व रामराजे यांच्यातील शाब्दिक चकमक थांबत नव्हती. या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या पॅनेलविरोधात उदयनराजेंचेच पॅनेल उभे ठाकण्याची चिन्हे निर्माण झाली होती. हा संघर्ष सुरु असताना आमदार शशिकांत शिंदे नवी मुंबई येथील महानगरपालिकेच्या प्रचारात गुंतले होते. या कालावधीत त्यांना जिल्ह्यात विशेष लक्ष घालता आले नाही. मात्र, रामराजे, लक्ष्मणराव पाटील यांनी बारामतीकरांशी बोलणी सुरु ठेवून जिल्हा बँकेच्या उमेदवाऱ्या जवळपास निश्चित केल्या होत्या.
अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आ. प्रभाकर घार्गे, लक्ष्मणराव पाटील, विक्रमसिंह पाटणकर अनिल देसाई यांना बिनविरोध करण्यात यश आले. महाबळेश्वरचे राजेंद्र राजपुरे तर अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीच बिनविरोध ठरले होते.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांना १४ ठिकाणी तीव्र विरोध झाला. या निर्माण झालेल्या पेचावर तोडगा काढण्याचे काम ऐनवेळी आ. शशिकांत शिंदे यांनी सुरु केले. महिला राखीवच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीने सुरेखा पाटील व कांचन साळुंखे यांना उमेदवारी दिली. पण कुडाळच्या सुनेत्रा शिंदे यांनी यांचा अर्ज या दोघींविरोधात राहिला.
उमेदवारी न मिळाल्याने सुनेत्रा शिंदे नाराज होत्या. शशिकांत शिंदे यांनी त्यांच्याशी बोलणी केली. ही बोलणी यशस्वीसुध्दा झाली. त्यामुळे शिंदेंनी आपल्या कोरेगाव मतदारसंघातील दोन्ही महिला उमेदवारांची वाट मोकळी केली.
आता प्रभाकर साबळे , आ. जयकुमार गोरे, धनंजय पाटील, बकाजीराव पाटील, राजेंद्र नेवसे, विलासराव पाटील-उंडाळकर, लालासाहेब शिंदे, आनंदराव शेळके-पाटील, आ. बाळासाहेब पाटील, सुरेश गायकवाड, दिनकर शिंदे , जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, तुकाराम शिंदे , सुरेश गायकवाड , बाळासाहेब शिरसट, अजय धायगुडे-पाटील, शिवाजी भोसले, आ. बाळासाहेब पाटील, बकाजीराव पाटील, आनंदराव शेळके-पाटील, लालासाहेब शिंदे यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यातही रंगत आली आहे.


एकाच दगडात मारले तीन पक्षी
जिल्हा बँक निवडणुकीत सुनेत्रा शिंदे यांचा पाठिंबा मिळवून आ. शिंदे यांनी एकाच दगडात तीन पक्षी मारले. जावळी सोसायटी निवडणुकीत त्यांना सुनेत्रा शिंदे यांचे सहकार्य मिळणार आहे. तसेच कोरेगाव मतदारसंघातील दोन जागा सुरक्षित करुन पक्षाला आपली चाणक्य नीतीही दाखवून दिली आहे.
कऱ्हाडच्या सुभेदारांशी तहाची बोलणी
कृषी प्रक्रिया मतदारसंघातून दोन निवडणुकांमध्ये डावलले गेल्याने आ. बाळासाहेब पाटील नाराज आहेत. या कऱ्हाडच्या नाराज सुभेदारांची समजूत घालण्याची जबाबदारी आता आ. शिंदेंवर येऊन पडली आहे. कोरेगावचे माजी संचालक लालासाहेब शिंदेंशीही त्यांची बोलणी सुरु आहेत. एकाचवेळी चार आघाड्यांवर सध्या शिंदेंची तहाची बोलणी सुरु आहेत.

Web Title: Shindechi move after Ramarajane configuration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.