‘शिधा’ येईना घरी, ‘पत्रिका’ राहिली कोरी!
By Admin | Updated: December 29, 2014 23:35 IST2014-12-29T22:13:15+5:302014-12-29T23:35:56+5:30
सहा महिन्यांपासून वंचित : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचा उद्रेक

‘शिधा’ येईना घरी, ‘पत्रिका’ राहिली कोरी!
सातारा : शासनाने नागरिकांना कमी पैशात धान्य मिळावे यासाठी गावोगावी स्वस्त धान्य दुकाने उघडली आहेत. मात्र, येथील गुरुवार पेठ, मल्हार पेठ येथील दुकानमालकाने नागरिकांना गेल्या सहा महिन्यांपासून धान्य आणि रॉकेलपासून वंचित ठेवले आहे. याचा उद्रेक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी व्यक्त केला.
मल्हार पेठ येथे प्रमोद तपासे हे रेशनिंगचे दुकान चालवितात. या दुकानात असलेल्या कार्डधारकांना गेल्या सहा महिन्यांपासून धान्य आणि रॉकेल मिळाले नाही. याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. महिलांनी कोरी शिधापत्रिका उंचावून शासनाचा निषेध केला. तर दुकानमालक काळ्या बाजारात गहू, तांदूळ विकत असल्याचा आरोप करत शिधापत्रिकाधारकांनी तपासे यांच्याकडून दुकानाचा परवाना काढून घ्यावा, अन्यथा आम्हाला दुसऱ्या दुकानात समाविष्ट करावे, अशी मागणी केली.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुकानदार प्रमोद तपासे हे नवीन कार्डधारकांना चार-पाच महिने रेशनिंग देत नाहीत.
पाच रुपये किलोचे धान्य ते ९ ते १० रुपये किलोन विकतात. प्रतिकुटुंब फक्त तीन किलो धान्य देतात. कार्ड वेगळे असले तरी रेशन दिले जात नाही. यामध्ये अनेक कार्डधारक असे आहेत की ज्यांचे धान्य प्रमोद तपासे यांच्याकडे तर रॉकेल विजय बडेकर यांच्याकडे आहे. मात्र तेही त्यांना मिळत नाही. तपासे यांच्याकडून दुकान काढून घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनावर शंभर शिधापत्रिकाधारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)