जयकुमारांच्या पाडावासाठी शेखर गोरेंना तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2015 00:36 IST2015-04-22T23:58:26+5:302015-04-23T00:36:38+5:30

राष्ट्रवादीची अनोखी खेळी : भविष्यात माणमधील राजकीय समीकरणे बदलणार...

Shekhar Gorena Ticket for Jayakumar's demise | जयकुमारांच्या पाडावासाठी शेखर गोरेंना तिकीट

जयकुमारांच्या पाडावासाठी शेखर गोरेंना तिकीट

नितीन काळेल -सातारा
सातारा जिल्हा बँकेत संचालक म्हणून जाण्याचा विडा उचलणारे माण पंचायत समितीचे सदस्य व ‘रासप’चे शेखर गोरे यांना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार जयकुमार गोरे यांचा पाडाव करण्यासाठीच उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित आहे. आमदारांना बँक प्रवेशापासून रोखून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणणे यासाठीच राष्ट्रवादीने ही खेळी केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेखर गोरे यांना राष्ट्रवादीतील काहीनी पक्षप्रवेशाची अट घातल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात माण मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार, हे निश्चित आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या अगोदरपासून माण तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तालुक्यातील सोसायटी ठरावांच्या निमित्ताने माणमध्ये राजकीय धुमशान जोरात झाले आहे. आंधळी सोसायटी पदाधिकारी निवडीत तर आमदार जयकुमार गोरे आणि पंचायत समिती सदस्य शेखर गोरे गटांत जोरदार राडा झाला होता. त्यामुळे आंधळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रशासनाला चक्क साताऱ्यात घ्यावी लागली होती. ऐवढा तीव्र राजकीय संघर्ष माण तालुक्यात पेटला आहे. हा संघर्ष आमदार गोरे आणि शेखर गोरे या दोघा बंधूंतच सुरू आहे. दोघेही एकमेकांच्या विरोधात कट्टरपणे उभे आहेत.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी माणमधून सोसायटी मतदारसंघातून आमदार गोरे, माजी आमदार सदाशिवराव पोळ, मनोजकुमार पोळ आदी इच्छुक आहेत. इतर मागास प्रवर्गातून जिल्ह्यातून अनेकजण उमेदवारीसाठी आग्रही असले तरी माणमधील शेखर गोरे यांनीही अर्ज भरला आहे.
माणमधील सोसायटी मतदारसंघातील निवडणूक ही आमदार गोरे आणि पोळ पित्रापुत्रांपैकी एकाशी होणार, हे निश्चित आहे. आमदार गोरेंना जिल्हा बँकेत प्रवेश करण्यापासून दूर ठेवायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला शेखर गोरे यांना जवळ करणे कमप्राप्त होते. कारण, शेखर गोरे आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आले तरच आमदार गोरे यांना शह देणे सोपे होणार आहे. त्यामुळे शेखर गोरे यांना इतर मागास प्रवर्गातून अर्ज भरायला लावणे, हे राष्ट्रवादीने ठरवून केल्याप्रमाणेच आहे. त्यामुळे इतर मागास प्रवर्गातून जिल्ह्यातील अनेकांनी अर्ज भरले असले तरी आमदार गोरेंना रोखण्यासाठी शेखर गोरे यांनाच अंतिम उमेदवारी मिळणार, हे समोर येत आहे.
कशाही पद्धतीने आमदारांना बँकेत येऊ द्यायचे नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरविले आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीची नेतेमंडळीही पावले टाकत आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठांनी शेखर गोरेंना पक्षप्रवेशाची आॅफर दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. पण, शेखर गोरे हे लगेच त्यावर विचार करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कदाचित काहीतरी निर्णय सांगून ते बँकेतील प्रवेश सुखकर करतील एवढेच सध्यातरी दिसत आहे. असे असले तरी माण मतदारसंघातील भविष्यातील राजकीय समीकरणे यामुळे बदलणार, हे निश्चित मानले जात आहे.


लोहा लोहे को काँटता हैं !
माण तालुक्यात आज आमदार जयकुमार गोरे यांची घोडदौड सुरू आहे. त्यानंतर शेखर गोरे म्हणजेच राष्ट्रीय समाज पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेतेमंडळी अधिक असल्याने अंतर्गत मतभेद अधिक आहेत. आमदार गोरे यांना रोखायचे असेल तर शेखर गोरे यांच्यासारखा हुकमी एक्का तालुक्यात दुसरा कोणी नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीने भावाविरोधात भावाला उभे करण्याचे ठरविले असावे. ‘लोहा लोहे को ही काँटता हैं,’ हे या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता दिसून येणार आहे.


५राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप माझ्यासमोर आलेला नाही. तसेच याबाबत कोणताही विचारसुद्धा मी अद्याप केलेला नाही.
- शेखर गोरे

Web Title: Shekhar Gorena Ticket for Jayakumar's demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.