शीलवंत यांचे कार्य भावी पिढीला प्रेरणादायी
By Admin | Updated: November 13, 2015 23:44 IST2015-11-13T21:49:29+5:302015-11-13T23:44:17+5:30
नागनाथ कोत्तापल्ले : ठोमसेत येथील कार्यक्रमात ‘आदर्श माता’ पुरस्काराचे वितरण

शीलवंत यांचे कार्य भावी पिढीला प्रेरणादायी
मल्हारपेठ : ‘मातीशी नाते जोडण्याचे काम सम्राट अशोकांचे पाईक अशोक शीलवंत यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभर तत्त्वज्ञान पोहोचविण्यासाठी आयुष्य झिजविले त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वेगवेगळ्या पद्धतीने समाजातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी तेच कार्य देशभर पुढे चालू ठेवण्याचे कौतुकास्पद कार्य करण्याचा वसा शीलवंत यांनी घेतला आहे,’ असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पूर्व कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
पाटण तालुक्यातील ठोमसे येथे पुणे (पिंपरी) येथील अशोक सर्वांगीण विकास सोसायटी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवानिमित्त व कमल आई काव्य महोत्सवानिमित्त आई काव्य महोत्सव व पुस्तक तुला, आदर्श माता पुरस्कार व आई काव्य पुरस्कार वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सत्यजितसिंह पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोत्तापल्ले म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेबांच्या विचारांने प्रेरित झालेल्या व्यक्तीकडून माती आणि मातेचा होत असलेला सन्मान हा येणाऱ्या पिढीपुढे प्रेरणादायी ठरणार आहे. संपूर्ण आयुष्यात बाबासाहेबांनी ज्या संघर्षातून आदर्श विचारांची ज्योत तेवत ठेवली, त्याच आदर्शांना अंगीकारून शीलवंत हे करत असलेले कार्य युवकांनाही आदर्श ठरत असून कौतुकास्पद आहे.’
यावेळी आदर्श माता पुरस्कार केशरबाई कानडे (उस्मानाबाद), सुलोचना लादे (कऱ्हाड), कांताबाई सुर्वे (ठोमसे), अलका जोगदंड (राजगुरुनगर), सखुबाई कांबळे (पिंपरी) यांना देण्यात आला. तर आई काव्य पुरस्कार चंद्रकांत वानखेडे (जळगाव), लता ऐवळे (सांगली), रमजान मुल्ला (इस्लामपूर), राजेंद्र वाघ (वारजे), अस्मिता चांदणे (भोसरी), प्रभाकर वाघोले (निगडी), विद्या कदम (बिबवेवाडी) यांना देण्यात आला.
डॉ. शीलवंत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सामाजिक, साहित्यिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच दयानंद शीलवंत यांनी आभार मानले. (वार्ताहर)