वाढदिवशीच तिला मृत्यूने कवटाळले !

By Admin | Updated: May 3, 2014 14:34 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T14:34:22+5:30

इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

She died on her birthday! | वाढदिवशीच तिला मृत्यूने कवटाळले !

वाढदिवशीच तिला मृत्यूने कवटाळले !

- भरधाव डंपरची दुचाकीला धडक, विद्यार्थिनी जागीच ठार ; डंपरचालकास अटक

कोल्हापूर : ती गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाचा शेवटचा पेपर देऊन दुचाकीवरून मैत्रिणीसमवेत घरी निघाली होती आणि त्यात तिचा आज (शुक्रवार) वाढदिवस... तिच्या चेहर्‍यावर आनंद व हास्याचे फवारे होते... तिची दुचाकी गाडी शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरून थेट टाकाळ्याकडे येत होती... कडक ऊन अन् वेळ दुपारी एक वाजण्याची... याच सुमारास अनुकामाणिका मंदिराजवळ पाठीमागून भरधाव येणार्‍या डंपरची तिच्या दुचाकीला जोराची धडक बसली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
काजल राजेंद्र पाटील (वय १८, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) असे तिचे नाव. तिच्या मृत्यूची वार्ता कळताच सीपीआर रुग्णालयाच्या आवारात तिच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला. दरम्यान, या अपघातप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित डंपरचालक बाहुबली जिन्नाप्पा शेट्याबोळ (३५, रा. मणेर मळा, गणेश कॉलनी, उचगाव, ता. करवीर) याला अटक केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, काजल पाटील व तिची मैत्रीण (नाव समजू शकले नाही) दुचाकीवरून शिवाजी विद्यापीठाकडून टाकाळ्याकडे येत होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव येणार्‍या डंपरने काजलच्या गाडीला जोराची धडक दिली. यात ती रस्त्यावर पडून डंपरखाली सापडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक तेथून पसार झाला. राजारामपुरी पोलिसांनी पंचनामा करून काजलची गाडी व डंपर पोलीस ठाण्यास आणला. यानंतर हा प्रकार तिच्या घरच्यांना कळविला. (प्रतिनिधी)

चौकट : डंपरवर दगडफेक...
घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. त्यामुळे संतप्त जमावाने अपघातानंतर डंपरवर जोरदार दगडफेक केली. यावेळी पोलीस येताच जमाव शांत झाला.
वाढदिवसाचा बेत!
मृत काजलचे वडील सत्यशोधक सहकारी बँकेत वसुली अधिकारी म्हणून काम करतात. ते मूळ नंदगाव (ता. करवीर) येथील आहेत. त्यांना पत्नी, दोन मुली आहेत. त्यांच्या पहिल्या मुलगीचा विवाह झाला आहे. त्यामुळे सानेगुरुजी वसाहत परिसरातील घरामध्ये तिघेजण राहात होते. आज (शुक्रवार) वाढदिवस अन् परीक्षेचा शेवटचा पेपर होता. तिचा सायंकाळी वाढदिवस करण्याचा बेत तिच्या कुटुंबीयांनी आखला होता. मात्र, वाढदिवस होण्याअगोदरच तिच्यावर काळाने झडप घातली.

फोटो : ०२ कोल-काजल पाटील
फोटो : ०२ कोल-सीपीआर ०१ व ०२
कोल्हापुरात शुक्रवारी दुचाकीच्या डंपरने दिलेल्या जोराच्या धडकेत सानेगुरुजी वसाहत परिसरातील काजल पाटील या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर काजलच्या आई, वडील व बहिणीने सीपीआर रुग्णालयात एकच हंबरडा फोडला होता.
फोटो : ०२ कोल-डंपर तोडफोड
टाकाळा परिसरात अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक केली.
फोटो : ०२ कोल- बाहुबली शेटेबोळ
(छाया : दीपक जाधव)

Web Title: She died on her birthday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.