शतायु ग्रंथालये, ग्रंथकारांचे चिपळूणमध्ये अधिवेशन

By Admin | Updated: August 7, 2014 00:28 IST2014-08-06T21:22:59+5:302014-08-07T00:28:30+5:30

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त ९ ते ११ जानेवारी

Shatayu libraries and the writers of writers in Chiplun | शतायु ग्रंथालये, ग्रंथकारांचे चिपळूणमध्ये अधिवेशन

शतायु ग्रंथालये, ग्रंथकारांचे चिपळूणमध्ये अधिवेशन

चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त ९ ते ११ जानेवारी या कालावधीत होणारे शतायु ग्रंथालये व ग्रंथकार अधिवेशन उत्साहात करण्याचा निश्चय साहित्यप्रेमींनी केला आहे.
ग्रंथालयात नुकत्याच झालेल्या सभेला शहरातील साहित्यप्रेमी उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी एक संयोजन समिती ग्रंथालयाचे अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. कार्यवाहपदी प्रकाश काणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष म्हणून डॉ. यतीन जाधव काम करणार आहेत. सभेच्या सुरुवातीला काणे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन अधिवेशन घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात शंभराहून अधिक शतायु ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांचा इतिहास एकत्र करुन अशी ग्रंथालये आणि ग्रंथकार यांची माहिती असलेली स्मरणिका प्रकाशित करणार असल्याचे सांगितले. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील व्याख्यानमालांचे अधिवेशन झाले होते. तसेच हे अधिवेशन होणार आहे. वाचकांना उत्तम साहित्य खरेदी करता यावे, यासाठी ग्रंथजत्राही होणार आहे. नामवंत प्रकाशकांना यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. ब्राह्मण सहाय्यक संघाच्या प्रांगणात हे अधिवेशन होणार असून, परिसंवाद, हास्यकवी संमेलन, साहित्यिकांच्या मुलाखती असे विविध कार्यक्रम होणार आहेत. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी एक स्वागत समिती गठीत करण्यात येणार आहे. संमेलनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. लवकरच अधिवेशनाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या सभेला अंजली बर्वे, माधुरी पोटे, सीमा रानडे, प्रकाश घायाळकर, विनायक ओक, श्रीराम दुर्गे, गिरीधर साठे, अविनाश पोंक्षे, महमद झारे, शिवाजी शिंदे, किशोर फडके, श्रीराम दांडेकर, सुनील कुलकर्णी, मधुसुदन केतकर, गोसावी, रमेश चिपळूणकर उपस्थित होते. चिपळूण नगर परिषदेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला ३० वर्षे मुदतीने जागा दिली आहे. यामुळे ग्रंथालयाच्या दर्जात बदल होण्यास त्याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shatayu libraries and the writers of writers in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.