शशिकांत शिंदेच बनलेत संपर्कहीन !
By Admin | Updated: April 17, 2015 00:03 IST2015-04-16T23:19:35+5:302015-04-17T00:03:19+5:30
शिवसेनेचा प्रतिटोला : पालकमंत्र्यांवरील टीकेला दिले जोरदार प्रत्युत्तर

शशिकांत शिंदेच बनलेत संपर्कहीन !
सातारा : ‘पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अभ्यासाची मापे काढण्याऐवजी माजी पालकमंत्र्यांनी १५ वर्षांत काय दिवे लावले याचे आधी आत्मपरीक्षण करावे. आधी आपल्याजवळील अंधार बघा, नंतर फोनवरून थातूरमातूर वक्तव्ये करा. दुसऱ्याची मापे काढण्यापेक्षा मतदारसंघात वेळ दिला तर तुम्ही संपर्कहीन झाला आहात, असे म्हणण्याची वेळ येणार नाही,’ असा टोला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांना लगावला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जलसंपदा खाते गेली १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या कालावधीत शिंदेंच्या नेत्यांनी व बगलबच्च्यांनी दुष्काळी भागातील प्रकल्पांमध्ये कसा मलिदा लाटला, हे जनतेला ज्ञात आहे. आता सत्ता गेल्याने व दुष्काळी जनतेने पुरते नाकारल्याने आमदार शशिकांत शिंदे यांचा तोल गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येऊन बोलण्याऐवजी त्यांच्यावर फोनवरून उत्तरे देण्याची वेळ आली आहे. त्यांच्याच मतदारसंघातील तीनशे कोटींचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना त्यांच्याच नेत्यांनी फक्त साठ कोटींना घेतला, तेव्हा शिंदे मूग गिळून गप्प का होते? हेही जनतेला माहीत आहे. या कारखान्याची रखवालदारी करण्यासाठीच शिंदेंना त्यांच्या तथाकथित दादांनी मंत्रिपद बहाल केले. तेव्हा आता शिंदेंने आपल्याकडे सत्ता नाही, याचे भान ठेवून वागावे.’
जाधव पुढे म्हणाले, ‘विजय शिवतारे हे आता मंत्री झाले आहेत. तरीही त्यांचा आवाका मोठा आहे. सातारा जिल्ह्यातील प्रश्नांबाबतीत विशेषत: दुष्काळी तालुक्यांबाबत त्यांनी विधानसभेतही योग्य भूमिका घेतली आहे. जिहे-कठापूर योजनेबाबत शिवसेनेने उपोषण केले होते. तेव्हा शशिकांत शिंदे यांनी आम्हाला सहा महिन्यांत जिहे-कठापूर योजना पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, हे आश्वासन त्यांनी पाळले का? शिवतारे यांचा अभ्यास कच्चा आहे, असे आपण म्हणता. कदाचित त्यांना मलिदा लाटण्याचे, जवळच्या बगलबच्च्यांना कंत्राटे देण्याचे माहीत नसेल. त्याबाबतीत ते नक्कीच कच्चे असतील; मात्र तुमच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यात ते पक्के आहेत. भविष्यात तेही तुम्हाला दिसेल,’ असा टोलाही जाधव यांनी लगावला. (प्रतिनिधी)