गोरगरीब ज्येष्ठांना शरयू, गंगास्नानाचा लाभ!

By Admin | Updated: October 8, 2015 21:59 IST2015-10-08T21:59:51+5:302015-10-08T21:59:51+5:30

काशीयात्रा करण्याची स्वप्ने उतारवयात अनेकांना असतात; पण त्यांना ती पूर्ण करता येत नाहीत. अशा ५० ज्येष्ठांना दरवर्षी अयोध्या आणि काशीचे दर्शन मोफत घडविण्याचा संकल्प ननावरे कुटुंबीयांनी सोडला.

Sharu, the benefactor of the Ganges! | गोरगरीब ज्येष्ठांना शरयू, गंगास्नानाचा लाभ!

गोरगरीब ज्येष्ठांना शरयू, गंगास्नानाचा लाभ!

लोणंद : धर्मपरायण बंधूंच्या स्मृती जपण्यासाठी लोणंदच्या (ता. खंडाळा) ननावरे कुटुंबीयांनी अनोखा मार्ग शोधला. दिवंगत प्रमोद लक्ष्मण ननावरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ९० ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी अयोध्या, काशीयात्रेचे भाग्य लाभलंय. दरवर्षी किमान ५० ज्येष्ठांना अशी यात्रा घडविण्याचा त्यांचा निर्धार आहे.देवाधर्माची आवड सर्वांनाच असते. धार्मिक स्थळांना भेट देऊन दर्शन घ्यावेसे वाटते. पवित्र नद्यांमध्ये स्नान करावेसे वाटते; पण अनेकांना ही संधी केवळ खिसा रिकामा असल्यामुळे मिळत नाही. गावाजवळून वाहणाऱ्या नदीलाच मग ‘गंगा’ मानले जाते. जीवनाचा पूर्वार्ध पोटामागे धावण्यात निघून जातो आणि उत्तरार्धातही मनाप्रमाणे धर्मक्षेत्री जाण्याची संधी मिळत नाही. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठांची वेदना ननावरे कुटुंबांनी जाणली.
प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असणाऱ्या अयोध्येचे दर्शन आणि सर्वाधिक पुण्यप्रद मानली जाणारी काशीयात्रा करण्याची स्वप्ने उतारवयात अनेकांना असतात; पण त्यांना ती पूर्ण करता येत नाहीत. अशा ५० ज्येष्ठांना दरवर्षी अयोध्या आणि काशीचे दर्शन मोफत घडविण्याचा संकल्प ननावरे कुटुंबीयांनी सोडला. या ५० जणांचा प्रवास, निवास आणि भोजनाची व्यवस्था करायला त्यांनी सुरुवात केली. परंतु प्रतिसाद वाढत गेला आणि तो लक्षात घेऊन ननावरे कुटुंबीयांनी ९० जणांची व्यवस्था केली आणि ही यात्रा सुरू झाली.
आपले दिवंगत थोरले बंधू प्रमोद ननावरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रवीण आणि प्रकाश ननावरे या दोन बंधूंनी धर्मसेवेचे व्रत घेतले आहे आणि गोरगरीबांना तीर्थयात्रा घडविण्यामधून धर्मसेवेबरोबरच मानवसेवाही त्यांच्याकडून घडत आहे. (प्रतिनिधी)


तीन लाखांहून अधिक खर्च
यावर्षी तीर्थयात्रेला गेलेल्या ९० ज्येष्ठ नागरिकांची संपूर्ण व्यवस्था करण्यासाठी प्रतीमाणशी साडेतीन हजार रुपये खर्च ननावरे कुटुंबीयांनी अपेक्षित धरला आहे. यावर्षी पहिलीच यात्रा असल्याने अंदाजापेक्षा अधिक खर्च होऊ शकतो. मात्र, साडेतीन हजारांच्या हिशोबानेही या यात्रेचा खर्च सव्वातीन लाखांच्या घरात पोहोचतो.


आमच्या थोरल्या बंधूंचा स्वभाव शांत होता. ते धार्मिक वृत्तीचे होते. समाजात त्यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठांना काशी, अयोध्या, प्रयागयात्रा मोफत घडविण्याचा उपक्रम कुटुंबीयांच्या वतीने दरवर्षी राबविणार आहोत.
- प्रवीण ननावरे, लोणंद
ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा घडविण्याचा ननावरे बंधूंचा उपक्रम स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. समाजाप्रती असलेल्या बांधीलकीची जाणीव ठेवून अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी हाती घेतले असून, ही बाब कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
- विनोद क्षीरसागर,
माजी सभापती, पंचायत समिती खंडाळा


ननावरे यांचे तीर्थाटन
ज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही यात्रा आयोजित केली आहे, ते दिवंगत प्रमोद लक्ष्मण ननावरे धार्मिक वृत्तीचे तर होतेच; शिवाय त्यांनाही तीर्थाटनाची मोठी आवड होती. देशभरातील अनेक तीर्थस्थळांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. चारधाम यात्रेबरोबरच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ते दर्शन घेऊन आले होते.

Web Title: Sharu, the benefactor of the Ganges!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.