दहावीच्या वर्गात शरद पवारांनी आखला विकासाचा आराखडा!

By Admin | Updated: November 16, 2014 00:02 IST2014-11-16T00:02:41+5:302014-11-16T00:02:41+5:30

एनकूळमध्ये चर्चा : गाव बारमाही बागायत करण्याचा निर्धार

Sharad Pawar's plan for development in class X | दहावीच्या वर्गात शरद पवारांनी आखला विकासाचा आराखडा!

दहावीच्या वर्गात शरद पवारांनी आखला विकासाचा आराखडा!

वडूज : एनकूळ गावातील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालयात खासदार शरद पवार यांनी या गावच्या विकासाचा आराखडा ठरविला. शाळेतील दहावीच्या वर्गात बसून शनिवारी त्यांनी सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या दीड तासाच्या कालावधीत गावच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा केली.
खासदार विजयसिंह
मोहिते-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर घार्गे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, शेळी-मेंढी पालन महामंडळाचे अध्यक्ष टी. आर. गारळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा नियोजन अधिकारी एच. एल. माळी, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विवेक साळुंखे, गटविकास अधिकारी राहुल देसाई आदींच्या उपस्थितीत पवारांनी गावच्या
विकासाचा निर्धार केला.
एनकूळ ग्रामस्थांनी चौकामध्ये पवारांचे जंगी स्वागत करुन सत्कार केला. दरम्यान, शनिवार असल्याने सकाळी साडेसात साडेअकरापर्यंत शाळा होती. पण या बैठकीमुळे सकाळी १0 वाजताच शाळा सोडण्यात आली होती. मुले ग्राऊंडवर थांबली होती. बैठक झाल्यानंतर पवारांसह अधिकारी व पदाधिकारी दहावीच्या वर्गाबाहेर आले. त्यावेळी महर्षी शिंदे विद्यालयातील मुलींनी स्वागत गीत गायले. त्यानंतर पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गावच्या विकासाबाबत काही सूचना असतील तर त्या माझ्याकडे करा, असेही त्यांनी ग्रामस्थांना सुचविले. वाहनचालकासोबत एकटेच एनकूळमध्ये दाखल झालेले खासदार शरद पवार खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासोबत वडूजला गेले. वडूजच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये भोजन करुन ते पुण्याकडे रवाना झाले.
या बैठकीनंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधला. एनकूळचे सरपंच भाऊसाहेब खाडे, उपसरपंच सुदाम तुपे, ग्रामसेवक ए.पी.खाडे, ग्रामपंचायत सदस्य दया खरमाटे, विलास खरमाटे आदी सदस्य उपस्थित होते.
पाय ठेवायला जागा नव्हती
३000 लोकसंख्या असलेले एनकूळ हे गाव २00९ मध्ये निर्मल ग्राम ठरले होते. विकासाचा आणि पाण्याचा दुष्काळ असला तरी बुध्दीजीवी वर्गाचा सुकाळ या गावात आहे. गावचे सुपुत्र व मध्यप्रदेशात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ. सुदाम खाडे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन गाव दत्तक घेतल्याबद्दल आभार मानले होते. पवारांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ शाळेच्या मैदानात दाखल झाले होते.

Web Title: Sharad Pawar's plan for development in class X

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.