शरद पवारांनाच मार्केट कमिटीने लुटलेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST2021-02-09T04:42:10+5:302021-02-09T04:42:10+5:30
सातारा : ‘पवार साहेबांनी फार अभ्यासपूर्ण आत्मचरित्र लिहिलंय. बारामती येथून शेतमाल घेऊन ते पुण्याला गेले होते. तेथील मार्केट कमिटीमध्ये ...

शरद पवारांनाच मार्केट कमिटीने लुटलेय
सातारा : ‘पवार साहेबांनी फार अभ्यासपूर्ण आत्मचरित्र लिहिलंय. बारामती येथून शेतमाल घेऊन ते पुण्याला गेले होते. तेथील मार्केट कमिटीमध्ये त्यांना कशा पद्धतीने लुटले गेले, याचे वर्णन केलेय. शेतकऱ्याला मार्केट कमिटीच्या बाहेर माल विकण्याचा अधिकार असावा असं त्यांनी म्हटलंय. शरद पवार यांचं आत्मचरित्रच कृषी नीती कायदा म्हणून लागू करावं,’ असे मत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलंय.
खोत यांनी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये प्रसिद्धीमाध्यमांशी साधलेल्या संवादात केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचे समर्थन केले तसेच विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलनकर्त्यांशी अनेक चर्चेच्या फेऱ्या केल्या. चांद, तारे, आकाश द्या अशा संबंधित शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. या आंदोलकर्त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नात रस नाही. दिल्लीच्या दख्तावर पंतप्रधान कोण असावा, यात त्यांना रस आहे. नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आंदोलन सुरू आहे. निवडणूक होत नाही तोवर विरोधक आंदोलन तापवत राहतील. अन्याय होणार असेल तर सरकारसमोर मांडून मार्ग काढावा. केंद्र सरकारने आता चर्चेचे दरवाजे बंद करावेत आणि कृषी कायद्यांची अंमलबजावणी सक्षमपणे देशभर करावी, शेतकऱ्यांना सक्षम बाजारपेठा निर्माण करून शेतमाल विक्री करण्याची मुभा द्यावी. आमचा बाप पिकवायला शिकला विकायला शिकला नाही. दिल्लीतील आंदोलनात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणारे लोक आहेत, त्यांचा नाद आता सोडावा.’
कृषी कायद्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने काय आणलंय, ते मोदींनी स्पष्ट करावं. काही लोकांना केंद्रातील तिजोरीतून करोडो रुपये हाणायचे आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर चुराडा करायचा. या देशामध्ये शेतमाल आधारभूत किंमतीनं खरेदी करायला सरकार तयार आहे. शेतकऱ्याला माल कुठे विकावा, याचं स्वातंत्र्य मिळावं.
चौकट..
‘पॉप गायिकेच्या ट्विटवर सचिन तेंडुलकर याने रिट्विट केले, त्यावर सचिनला शेतीमधील काय कळतं, अशी टीका शरद पवारांनी केली होती. याचंच मला हसू आलं. शरद पवार कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी किस्ताक घातलं होतं. ते कधी हिंदकेसरी झाले होते,’ असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला. आम्हीही नारळाच्यावर कुस्त्या खेळल्या असतील. मी सोडून बाकीच्यांना काही कळत नाही म्हणत इतरांना कमी लेखण्याची पद्धत महाराष्ट्रात रुजवली जात आहे. अनुभवातून दीर्घकाळ एका क्षेत्रात असल्यानंतर सर्वच अधिकार आपल्याला मिळत आहेत, अशी मानसिकता आहे. हे नवनेतृत्वाला हानीकारक आहे, असं मतही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
(शरद पवार आणि सदाभाऊ खोत यांचे आयकार्ड फोटो वापरावेत)