भैरेवाडी निवारा शेड पाहणीचे शंभूराज देसाईंचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:39 IST2021-04-04T04:39:45+5:302021-04-04T04:39:45+5:30
चाफळ : भैरेवाडी (ता. पाटण) गावातील तात्पुरत्या बारा निवारा शेडचे सुरू असलेले काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे केले ...

भैरेवाडी निवारा शेड पाहणीचे शंभूराज देसाईंचे आदेश
चाफळ : भैरेवाडी (ता. पाटण) गावातील तात्पुरत्या बारा निवारा शेडचे सुरू असलेले काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, याची तातडीने दखल घेत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी या कामाची पाहणी करण्याचे आदेश दिले. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे व शिवदौलत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन निकृष्ट दर्जाचे होत असलेल्या कामाची पाहणी करत ठेकेदारास इस्टिमेटनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या.
भैरेवाडी गावात गेल्या चार महिन्यांपूर्वी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कड्याचा काही भाग कोसळू लागल्याने सुमारे बारा घरांना यामुळे धोका निर्माण झाला होता. यावेळी या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी तातडीने बारा निवारा शेड बांधण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, ज्या ठेकेदाराला येथील निवारा शेड बांधण्याचे काम देण्यात आले आहे, त्यांने हे काम निकृष्ट पध्दतीने सुरू केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला होता. इस्टिमेटनुसार काम केले जात नाही. वाळू मिळू शकत नसल्याने ग्रीड काही प्रमाणात खडीत मिसळून त्यात अत्यंत कमी सिमेंट वापरून पाया भरण्यात आला आहे. तसेच कमी वजनाच्या पाईप, कमी गेजचा पत्रा, पातळ अँगल वापरून हे काम केले जात आहे. या शेडमध्ये येथील बारा कुटुंबे राहण्यास जाण्यापूर्वीच या निवारा शेडची दुरवस्था होईल, अशा पध्दतीने हे काम ठेकेदाराने सुरू केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे ‘लोकमत’ने प्रसिद्ध करत सर्वांचेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या वृत्ताची दखल घेत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी स्वतः यात लक्ष घालून निकृष्ट दर्जाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून काम दर्जेदार करून घेण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे व शिवदौलत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी, भैरेवाडी येथे प्रत्यक्ष जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदारास इस्टिमेटनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे भैरेवाडी येथील ग्रामस्थ समाधानी झाले असून, ‘लोकमत’ व राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना धन्यवाद देत आहेत.