शंभूराज देसार्इंची बोटे तुपात, पाटणकरांची भिस्त सभापतींवर !
By Admin | Updated: November 6, 2014 22:06 IST2014-11-06T21:04:23+5:302014-11-06T22:06:50+5:30
पाटण तालुका : बाजी पलटली, विकासाचे काय?

शंभूराज देसार्इंची बोटे तुपात, पाटणकरांची भिस्त सभापतींवर !
पाटण : तालुक्यात सत्ता बदलचे वारे वाहू लागले असून, देसाई-पाटणकरांच्या लढाईत आता बाजी पलटली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकी व पंचायत समितीची सत्ता उपभोगणाऱ्या पाटणकर गटावर आता केवळ पंचायत समितीतील सभापतिपदावर आपली हुकूमत पुढील पाच वर्षे चालू ठेवावी लागेल, तर आमदारकी, साखर कारखाना, पंचायत समिती, उपसभापतिपद अशी पाच ही बोटे तुपात असणाऱ्या देसाई गटाला चांगली उभारी आली आहे.
मात्र, सत्ता असूनही ती राबविता येत नाही, असा पूर्वानुभव पाहता तालुक्यात पलटलेल्या बाजीतून विकासाचे काय होणार? याकडे लक्ष लागले आहे.
पाटण तालुका हा तारळे, ढेबेवाडी, मोरणा, कोयना, चाफळ, कुंभारगाव यासारख्या विभागांनी विखुरला आहे. मात्र, तहसील कार्यालय, पंचयात समिती, पोलीस ठाणे यासारखी मुख्य कार्यालये पाटण शहरात आहेत. त्यामुळे २५ वर्षे आमदारकी राखणाऱ्या पाटणकरांचे वर्चस्व आजही या कार्यालयांवर दिसून येते. त्यामुळे सत्ता असो, वा नसो. ती कशी गाजवायची याची गणित नेमकी पाटणकर सोडवितात. याचं उदाहरण म्हणजे, देसाई गटाचा सभापती असताना पंचायत समितीच्या पशुसंवर्धन इमारतीचे उद्घाटन पाटणकरांनी मोठ्या कौशल्याने केले, तर विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असतानाही विक्रमसिंह पाटणकर यांनी नव्याने बांधकाम सुरू असणाऱ्या पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी करून नवीन आमदार शंभूराज देसार्इंना सत्ता राबविता येत नाही, हे दाखवून दिले.
आता आगामी पाच वर्षांत याच चाली पाटणमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे शंभूराज देसार्इंना मोठी व्यूहरचना करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
पाटणकर गटाची सभापत्)िापदावर ओळख...
पाटणकर गटाला आपले अस्तित्व पुढील पाच वर्षे टिकवून ठेवण्यासाठी केवळ सभापतिपदावर आपली ओळख टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. शंभूराज देसाई आपल्या आमदारकीवर काय काम करतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यावरून तालुक्याचा विकास अवलंबून आहे.