‘काठावरची परंपरा’ शंभूराजनी मोडून काढली!
By Admin | Updated: October 20, 2014 00:38 IST2014-10-19T22:52:28+5:302014-10-20T00:38:55+5:30
थंड डोक्याने वापरलेला गनिमी कावा यशस्वी ठरल्यामुळे पाटण तालुक्यात उठाव झाला.

‘काठावरची परंपरा’ शंभूराजनी मोडून काढली!
पाटण : पाटणच्या लढतीबाबतचे राजकीय विश्लेषकांचे अंदाज धुळीस मिळवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह यांचा तब्बल १८,८२४ मतांनी पराभर करत नवा इतिहास रचला. सततच्या पराभवाची चिड आणि पेटून उठलेला देसाई गटाचा कार्यकर्ता व शंभूराज यांनी थंड डोक्याने वापरलेला गनिमी कावा यशस्वी ठरल्यामुळे पाटण तालुक्यात उठाव झाला. त्यातच पाटणकरांनी उमेदवारांनी बदलल्याने गटातील काही नाराजांनी आपला उद्रेक विरोधातून दाखवत पाटणकरांना हादरा दिला. त्यामुळे विक्रमसिंह पाटणकर हे कोयना, पाटण या बालेकिल्ल्यासह सर्वच पातळीवर अपयशी ठरले.
पाटण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी रविवार, दि. १९ रोजी सकाळी आठ वाजता सुरू झाली. शंभूराज देसाई हे प्रथमच गळ्यात भगवी पट्टी टाकून व डोक्यात गांधी टोपी घालून मतमोजणी केंद्रावर आले. तर सत्यजितसिंह पाटणकर त्यानंतर केंद्रावर पोहोचले. प्रथम कोयना विभागातील हेळवाक गटातील चौदा मतदान केंद्राचा मतमोजणीचा निकाल प्रथम लागला. त्यामध्ये १६९ मतांची आघाडी देसार्इंना देऊन गेली.
कोयना, पाटण हे पाटणकरांचे बालेकिल्ले. तिथेच शंभूराज यांनी आघाडी घेतली. त्यामुळे देसार्इंचा कल दिसून आला. त्यानंतरच्या मतमोजणीच्या बारा फेऱ्यांमध्ये सत्यजितसिंह पाटणकर आघाडीवर होते.
बाराव्या फेरीनंतर, सोळाव्या फेरीनंतर शंभूराज देसाई यांनी १,७६५ मतांची आघाडी घेत २९ व्या फेरीपर्यंत मुसंडी मारली. अखेर १८,८२४ मतांची विक्रमी आघाडी घेत शंभूराज देसाई निवडून आले. कोयना, पाटण, तारळे, मरळी, मल्हारपेठ, सुपने कुंभारगाव, तांबवे, चाफळ, मारुल हवेली अशा सर्वच जिल्हा परिषद गटांतून शंभूराज देसाई यांनी अलगद मुसंडी मारली.
शंभूराज देसाई यांचे वाढते मताधिक्य पाहता, ते १३,५०० च्या मतांची आघाडी घेऊन पुढे होते. त्यानंतर फक्त चार फेऱ्यांची मतमोजणी करायची बाकी होती. तेव्हा दुपारी साडेतीनच्या सुमारास सत्यजितसिंह पाटणकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत निघून गेले. २००४ मध्ये ५,४०० मतांनी विजयी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा शंभूराज देसाई यांना २००९ मध्ये ५८० मतांनी पराभवाला समोर जावे लागले होते. त्याआगोदर विक्रमसिंह पाटणकर यांच्यासमोरचे दोन निसटते पराभव शभूराज यांना जिव्हारी लागले होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी १९८० मध्ये विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर विक्रमसिंह पाटणकर यांनी शंभूराज यांचे आई-वडील शिवाजीराव व विजयादेवी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. जवळपास २२ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे पराभवाचे चटके सोसलेल्या देसाई घराण्याच्या परतफेड करण्यासाठी शंभूराज यांनी पाटणकर विरोधात कंबर कसली होती.
२०१४ च्या निवडणुकीत त्यांनी गत दोन वर्षांपासून केलेले नेटके नियोजन व घेतलेले परिश्रम आणि शिवसेनेचा खांद्यावर भगवा घेऊन तयारी केली. त्यातच तिकडे विक्रमसिंह पाटणकर यांनी सत्यजितसिंह यांचे लॉचिंग करण्याचे ठरविल्याने आणि त्यांनी तसे धाडस केल्यामुळे ते अंगलट आले आणि निवडणुकीत पाटणकर प्रत्येक टप्प्यात अयशस्वी ठरले.
पाटण जिल्हा परिषद गटातील गतवेळेचे १२ हजारांचे मताधिक्य देखील याखेपेस पाटणकर हरवून बसले. आणि दुसरीकडे शंभूराज यांनी संपूर्ण तालुक्याला डोक्यावर घेतले. त्यातच सुपने, कुंभारगाव, तांबवे हे कऱ्हाडमधील विभागदेखील देसार्इंच्या बाजूने राहिले. त्यामुळे १८,८२४ मतांनी शंभूराज यांचा विजयी झाला.
निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जाधव यांनी शंभूराज देसाई विजयी झाल्याचे घोषित करताच मतमोजणी केंद्राच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर शंभूराज यांनी पाटण शहरात जाऊन लायबरी चौकातील गणेशाचे दर्शन घेतले. त्यावेळी याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला. (प्रतिनिधी)
पाटण ते मरळी कारखाना भव्य मिरवणूक
कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरील पाटणपासून शंभूराज देसाई यांची मिरवणूक सुरू झाली. म्हावशी येरफळे, अडूळ, नवारस्ता, मरळी, चोपदारवाडी येथील जनतेने त्यांचे भव्य स्वागत केले. महिलांनी हातामध्ये आरत्या घेऊन शंभूराज यांना ओवाळले.
मरळी कारखाना परिसरात गुढ्या उभारल्या
शंभूराज देसाई यांचे स्वागत करण्यासाठी मरळी गावात घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या.
पाटण शहरात सामसूम, दुकान बंद
सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव झाल्यामुळे पाटण शहरातील दुकाने बंद झाली, रस्त्यावर टायर पेटविण्यात आले. म्हावशी येथे पाटणकर समर्थकांनी दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
पाटणकरांना चिंतन करायला लावणारा निकाल
पाटण तालुक्यात पक्षापेक्षा देसाई व पाटणकर गट म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शंभूराज यांच्याबाजूने लागलेला १८,८२४ या मताधिक्याचा निकाल पाटणकर गटाचे अस्तित्व दाखवून देणारा ठरला आहे. त्यामुळे यापुढील काही महिने, वर्षे पाटणकर गटाला चिंतन करायला लागणार आहे. पाटणची लढत म्हणजे अत्यंत चुरशीची व काठावरची असते. मात्र, याखेपेस अगदी सर्व गणित व समीकरणे मोडीत काढून शंभूराज यांनी लक्षणीय मताधिक्य घेतले.
उमेदवारपक्षमिळालेली मते
२सत्यजितसिंह पाटणकरराष्ट्रवादी८५,५९५
३हिंदुराव पाटीलकाँगे्रस७,६४२
4दीपक महाडिकभाजप२,१०२
5रवींद्र शेलारमनसे६४३
6शिवाजी कांबळेबसप४५५
7हनुमंत पाटीललो.आं.पा.१५१
डॉ. संदीप माने (शेतकरी कामगार पक्ष -१२५), प्रियांका साळुंखे (बहुजन मुक्ती पार्टी -८९)
अपक्ष : सागर माने (२,०८४), दत्तात्रय भिसे (१,२८७), गणेश मोरे (८८८),
चंद्रकांत यादव (२३७), सुनील कांबळे (२१२), बंडू गळवे (११०)
(शंभूराज देसाई १८,८२४ मताधिक्याने विजयी)
जनतेच्या दारात सत्ता आणण्यात यशस्वी
पाटणच्या वाड्यात अडकलेली सत्ता जनतेच्या दारात आणण्यात यशस्वी झालो आहे. पाटणच्या जनतेने व माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी कधीच विसरणार नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पुण्यकाळ पुन्हा पाटण तालुक्यात अवतरेल, असेच काम करुन दाखवेन. धनशक्तचा अस्त आणि जनशक्तीचा सुर्योदय झाला आहे.
- शंभूराज देसाई, शिवसेना
पाटणच्या जनतेसाठी सदैव कार्यरत
पराभवाने खचून जावू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सर्वांनी शांतता राखावी. जनतेने दिलेला कौल मी मान्य करतो. यापुढेही पाटणच्या जनतेसाठी सदैव कार्यरत राहीन. झालेल्या पराभवाची कारणे शोधून पुढील दिशा ठरवली जाईल.
- सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादी