शाहूपुरीत बालकुमार साहित्य संमेलन
By Admin | Updated: December 1, 2015 00:19 IST2015-11-30T21:23:48+5:302015-12-01T00:19:40+5:30
विद्यार्थीच असणार अध्यक्ष : ४, ५ डिसेंबर रोजी आयोजन

शाहूपुरीत बालकुमार साहित्य संमेलन
शाहूपुरी : शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ४ व ५ डिसेंबर रोजी शाहूपुरीतील समाजमंदिरात बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्या हस्ते होणार आहे. राजेश लोटेकर हा विद्यार्थी संमेलनाध्यक्ष असणार आहे.
याबाबतची माहिती राष्ट्रीय एकात्मता विकास कार्यसंघाचे अध्यक्ष भारत भोसले यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांना मराठी भाषा, साहित्यसंपदा, साहित्यिकांची ओळख व्हावी, त्यांच्यात भाषेची आवड जोपासली जावी, यासाठी हे संमेलन आयोजित केले आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी काढली जाणार आहे. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, संमेलनाचे अध्यक्ष राजेश लोटेकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर लगेच संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या ‘सह्याद्री’ या हस्तलिखिताचे प्रकाशन केले जाणार आहे. सव्वाअकरा वाजता प्रा. श्रीधर साळुंखे यांचे ‘माझी मराठी मायबोली’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी एक वाजता मुलांनी वाचलेल्या पुस्तकांवर आधारित अमृतमंथन हा कार्यक्रम प्रमोदिनी मंडपे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तीन वाजता ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा लोकगीतांचा कार्यक्रम विद्यार्थी सादर करणार आहेत.
शनिवार, दि. ५ रोजी सकाळी ८ वाजता नवोदित कवींचे काव्य संमेलन डॉ. राजेंद्र माने यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यावेळी कवी यशेंद्र क्षीरसागर, वसंत शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी नवोदितांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)