जगदीश कोष्टी, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : जावळी तालुक्यातील दुर्गम भागातील सरताळे, गणेशवाडी येथे नवरा-बायको, जीवन आणि सूरज ही दोन मुलं असं छोटं पण सुखी कुटुंब होतं. अशातच आजारपणामुळे पतीचं निधन झालं. त्यावेळी सूरज आठ वर्षांचा होता. दोघांनाही परिस्थितीची जाण होती. लहानपणापासूनच म्हणायचा, 'नोकरी करीन तर मिलिटरीतच.' हे केवळ खरं केलं नाही, देशावर चाल करून आलेल्या दोन दहशतवाद्यांना त्यानं कंठस्नान घातलं. यात त्याला वीर मरण आलं. पण, आज ऊर भरून येतो, अशा भावना शहीद जवान सूरज मोहिते यांच्या आई उषा मोहिते यांनी 'लोकमत'जवळ व्यक्त केल्या.
२०१५ मध्ये दहशतवादी हल्ल्यात सूरज शहीद झाले. उषा मोहिते म्हणाल्या, 'सूरजचा जन्म १६ डिसेंबर १९९३चा. बारावीपर्यतचं शिक्षण घेतलं. पण, वडिलांचं छत्र लवकर हरपल्यानं तो जबाबदारीनं वागत असायचा.
दोघांना धाडले यमसदनी
सूरज यांचा मोठा भाऊ जीवन हाही पोलिसात भरती झाला होता. त्यामुळे सूरजच्या स्वप्नांना आणखी बळ लाभलं. वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यात भरती होऊन बेळगावातून प्रशिक्षण घेतलं. अन् अवघ्या दोन वर्षांनी २० मार्च २०१५ रोजी जम्मूमधील कटवाला येथे देशसेवा बजावत असताना पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. या चकमकीत सूरजने दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. पण, यात त्याला वीर मरण आले. त्याला मरणोत्तर शौर्यपदक मिळाले आहे. भारत मातेचे रक्षण करताना एक मुलगा मी गमावला. पण, त्याचा अभिमान वाटतो.