डोंगरांवरील धनदांडग्याच्या हाॅटेलचे सांडपाणी नैसर्गिक जलस्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:52+5:302021-06-05T04:27:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा- कास-बामणोली जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे दोनशेहून अधिक लहान -मोठी हॉटेल आहेत. बहुतेक व्यावसायिकांनी सांडपाणी ...

Sewage of mountaineering hotels is a natural source of water | डोंगरांवरील धनदांडग्याच्या हाॅटेलचे सांडपाणी नैसर्गिक जलस्रोत

डोंगरांवरील धनदांडग्याच्या हाॅटेलचे सांडपाणी नैसर्गिक जलस्रोत

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा- कास-बामणोली जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे दोनशेहून अधिक लहान -मोठी हॉटेल आहेत. बहुतेक व्यावसायिकांनी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा (एसटीपी प्लँट) बसवलेले नाहीत. त्यामुळे या व्यावसायिकांचे सांडपाणी रोज मुरतं कुठं? असा प्रश्न आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही याची माहिती उपलब्ध नाही. रोज लाखो लिटर दूषित पाणी नैसर्गिक जलस्रोतात सोडणाऱ्या या धनदांडग्यांना चाप कोण लावणार, असा प्रश्न सजग पर्यावरणप्रेमी सातारकरांनी उपस्थित केला आहे.

युनेस्कोने कास पठाराला २०१३ मध्ये जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून मान्यता दिली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धनदांडग्यांची पावलं कास रस्त्याकडे वळली. गेल्या आठ दहा वर्षांत कास रस्त्यावर सुमारे २०० पेक्षा अधिक हॉटेल, रिसॉर्ट, कथित फार्महाऊसेस उभी राहिली आहेत. म्हणायला ही वैयक्तिक निवासस्थानं असली तरी प्रत्यक्षात या ठिकाणी राजरोसपणे व्यावसायिक वापर केला जातो. सातारा ते कास या सुमारे पंचवीस किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा आज अभावानेच रिकामी जागा पाहायला मिळते. यवतेश्वर पठारही कुंपणाने झाकोऴले आहे. २०१७ मध्ये तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने कास पठार परिसरात बांधकाम केल्यास बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जाईल, असे इशारा देणारे फलक लावले होते. हे फलकही नंतर काही हितचिंतकांनी गायब केले. कोरोनाच्या महामारीत उद्योग व्यवसाय ठप्प झाले असताना कास रस्त्यावर बांधकामे मात्र राजरोसपणे सुरू आहेत. आपणच लावलेल्या फलकांचा आणि दिलेल्या नोटिसांचा जिल्हा प्रशासनाला विसर पडला आहे.

हाॅटेल, लाॅजिंग, रिसाॅर्टमधून सोडून देण्यात येणाऱ्या सांडपाण्यात खाद्यान्न, तेल, मलमूत्र, रसायने यांचे घटक असतात. जे अन्नाच्या माध्यमांतून जलचरांच्या पोटात जाऊन जलचरांची साखळी खंडित होऊ शकते. खेकडे, मासे आदी अन्न म्हणून आपण वारंवार भक्षण करतो. त्या वेळी या दूषित अन्नाचा मानवी शरीरावर दीर्घकालीन परिणाम संभवतात. याशिवाय दूषित पाणी प्यायल्याने मानवी तसेच इतर सजीवांवरही परिणाम होतो. पश्चिम घाटाच्या या डोंगररांगेवर, सातारा-कास-बामणोली रस्त्याला काही शेकड्यांत हाॅटेल, फार्म नसलेली फार्म हाऊसेस, रिसाॅर्ट आहेत. या व्यावसायिकांकडे स्वत:च्या सांडपाण्याचा निचरा करण्याची कोणतीही शास्त्रोक्त यंत्रणा नाही. मग त्यांचं रोज निर्माण होणारं लाखो लिटर सांडपाणी जातं कुठे, याचा शोध घेण्याची तसदी शासकीय यंत्रणेने कधी घेतलेली नाही. जी अवस्था सातारा-कास-बामणोली रस्त्यांवरील बेकायदा बांधकामांची तीच परिस्थिती सांडपाण्याच्या निचऱ्याबाबत आहे.

या डोंगररांगेच्या तिन्ही बाजूला कण्हेर, उरमोडी, कास तलाव व शिवसागर जलाशय हे पाण्याचे मोठे साठे आहेत. या साठ्यांना अखेरीस मिळणारे लहान-मोठे ओहोळ, नद्या, नाले हे स्थानिक ग्रामस्थांच्या पिण्याच्या नैसर्गिक जलस्रोत आहेत. परिणामी या डोंगरी भागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या व्यावसायिकांकडे स्थानिक कामगारांची संख्या मोठी आहे. रोजीरोटीवर परिणाम होईल या भीतीने स्थानिक ग्रामस्थांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. वारसा म्हणून जागतिक पातळीवर पोहोचलेल्या कास पठाराचा निसर्ग वारसा शासनाला खरोखरच टिकवायचा असेल तर या धनधांडग्यांचे सांडपाणी मुरते कोठे, याचा शोध जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत घ्यावा, अशी सजग सातारकरांची मागणी आहे.

कोट....

"महाबळेश्वर -पाचगणी येथे २००० साली पहिला इको सेन्सेटिव्ह झोन तयार झाला. तेथील जैवविविधता सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात इतरत्र कास, ठोसेघर, चाळकेवाडी, पाटण, जावळी या भागांत पाहायला मिळते. त्यामुळे इको सेन्सेटिव्हबाबत महाबळेश्वरसारखे पर्यावरणीय निकष या अन्य भागात तातडीने अमलात आणले पाहिजेत."

- सुनील भोईटे

मानद वन्यजीव रक्षक, सातारा.

चौकट ...

सांडपाणी शुद्धीकरण संयंत्रणेमुळे ( सिवेज ट्रेटमेंट प्लान्ट) सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा बाग, शेती, बांधकाम, वाहने धुण्यासारख्या गोष्टींसाठी पुनर्वापर करता येईल. कास जलवाहिनीला दांडगाईने भगदाड पाडून काही खासगी व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे सातारकरांच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकला, हे उघड गुपीत आहे. किमान सांडपाण्याचा पुनर्वापर झाल्यास शुद्ध पाण्यावरील त्यांचा भार कमी होईल. याशिवाय जलप्रदूषणालाही आळा बसेल.

Web Title: Sewage of mountaineering hotels is a natural source of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.