संजय पाटीलकऱ्हाड : तालुक्याच्या पूर्व आणि दक्षिण विभागातील एकूण २७ गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीप्रश्न लक्षात घेता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे.कऱ्हाड तालुक्यात भौगोलिक असमतोल जाणवतो. कृष्णा, कोयना या बारमाही वाहणाऱ्या नद्यांसह वांग, उत्तरमांड, दक्षिण मांड, तारळी या उपनद्या तालुक्यातून वाहत असतानाही पूर्व आणि दक्षिणेतील काही गावांना मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्याही २७ गावांमध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आराखडा तयार केला असून, त्यानुसार विहीर अधिग्रहण करण्यासह टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.पिण्याच्या पाण्याबरोबरच काही गावांमध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. मध्यंतरी दोनवेळा वळीव पाऊस जोरदार कोसळल्याने तलावांसह विहिरीत काही प्रमाणात पाणी साचले होता. त्याचा पिकांना मोठा आधार मिळाला. मात्र, हे पाणी मेअखेरपर्यंत पुरणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात चांगला पाऊस न झाल्यास पिकांचीही होरपळ होणार आहे.
पाणी टंचाई भासणारी गावेकांबीरवाडी, वनवासमाची-खोडशी, अंतवडी, मांगवाडी, नाणेगाव, गोडवाडी, अंधारवाडी, संजयनगर-शेरे, पाल, भगतवाडी, मरळी, कोरिवळे, महारूगडेवाडी, काले-चपनेमळा, ओंडोशी, शेरे-थोरातमळा, कासारशिरंबे, रिसवड, गायकवाडवाडी, घोलपवाडी, नांदलापूर, चोरे, साखरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, बामणवाडी, वानरवाडी, गायकवाडवाडी, रिसवड, घोलपवाडी.
‘या’ गावांना टँकरने पाणीकाही गावांना पर्यायी पाण्याची व्यवस्था नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आराखड्यानुसार घोलपवाडी, नांदलापूर, चोरे, साखरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, बामणवाडी, वानरवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.
कऱ्हाड तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, आवश्यक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. ज्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे त्याठिकाणी तातडीने कामे सुरू होतील. टँकरची मागणी आल्यास तेथे टँकर सुरू केला जाईल. - आर. बी. साठे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, कऱ्हाड