कोयना धरणात सत्तर टीएमसी पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 16:15 IST2017-07-23T16:15:18+5:302017-07-23T16:15:18+5:30
ओलांडला महत्त्वाचा टप्पा : रात्रीत अडीच टीएमसीची भर

कोयना धरणात सत्तर टीएमसी पाणीसाठा
आॅनलाईन लोकमत
पाटण (जि. सातारा), दि. २३ : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात रात्रीत अडीच टीएमसीची भर पडली असून सध्या ७०.०७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
महाबळेश्वर, नवजा, कोयना या भागात शुक्रवार, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धरणात चोवीस तासांत तीन ते चार टीएमसीची भर पडत आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत धरणाने महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. धरणात शनिवारी सायंकाळी पाच वाजता ६८.६८ टीएमसी पाणीसाठा होता. तो रविवारी सकाळी ७०.०७ टीएमसीवर पोहोचला आहे.
साताऱ्यातही सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे-नाले भरुन वाहत आहेत. या पावसातही रविवारचा आठवडा बाजार भरला आहे. वारा वीजवाहक तारांना छेदत असताना मोठमोठा आवाज येत आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. ग्रामीण भागातून वीजवाहक तारांवर झाडाच्या फांद्या पडण्याच्या घटना घडत आहेत.
जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : सातारा १२.२, जावळी ४८.४, पाटण २१.९, कऱ्हाड २, कोरेगाव ०.६, खटाव ०.३, वाई २.१, महाबळेश्वर ३८.२.