सातवी पास सल्याचा ‘मार्इंड गेम’

By Admin | Updated: October 6, 2015 23:46 IST2015-10-06T21:32:25+5:302015-10-06T23:46:36+5:30

पस्तीसहून अधिक गंभीर गुन्हे : खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणीच्या गुन्ह्यांत क्रियाशिल सहभाग; वर्चस्वासाठी बांधली टोळी--कोण होता... काय झाला..

Seventh-bound Salain's 'mind game' | सातवी पास सल्याचा ‘मार्इंड गेम’

सातवी पास सल्याचा ‘मार्इंड गेम’

कऱ्हाड : गेल्या काही वर्षांपासून अनेक गंभीर गुन्ह्यांद्वारे पोलिसांना जेरीस आणणाऱ्या सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्याचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झाले आहे. मात्र, त्याचा गुन्हेगारी क्षेत्रातील प्रवास आणि त्यासाठी त्याने प्रत्येकवेळा खेळलेली खेळी थक्क करणारी आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण केलेल्या सल्यावर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, मारामारी, दरोडा यासारखे डझनावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर यापुर्वी तडीपारीची कारवाईही केली आहे. मात्र, गुन्हेगारी क्षेत्राशी निर्माण झालेली जवळीक, कुख्यात गुंडांचे पाठबळ, वर्चस्वासाठी झालेला विरोध आणि गाफील राहिलेली पोलीस यंत्रणा सल्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीसाठी पोषक ठरल्याचे दिसते.
महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा १५ जानेवारी २००९ रोजी खून झाला. त्या खुनात कुख्यात गुंड सल्या चेप्या याच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. त्यानंतर वेळोवेळी सल्या आणि त्याची टोळी चर्चेत राहिली. या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्या. त्याचबरोबर सल्याच्या विरोधातही याच कालावधीत अनेक टोळ्या उदयास आल्या. संजय पाटील यांच्या खुनप्रकरणी अटकेत असताना ५ मे २००९ रोजी सल्यावर सातारच्या जिल्हा रूग्णालयात गोळीबार झाला. त्यावेळी हल्लेखोराचा ‘नेम’ चुकल्याने सल्या बचावला. त्या प्रकरणात अनेक महिने कोणीही पोलिसांच्या हाती लागले नाही. मात्र, सल्याच्या विरोधात टोळी उभी राहत असल्याचे त्या घटनेवरून स्पष्ट झाले.
जिल्हा रूग्णालयातील गोळीबारानंतर २९ आॅक्टोबर २००९ रोजी पुन्हा कऱ्हाडच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात सल्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सुनावणीसाठी न्यायालयात आणलेल्या सल्यावर ‘वॉच’ ठेवून त्यावेळी हल्ला करण्यात आला. मात्र, त्यातुनही सल्या बचावला. या गोळीबार प्रकरणात अभिनंदन झेंडेच्या टोळीचा हात असल्याचे निष्पन्न झाले. अभिनंदन झेंडे हा काही वर्षांपुर्वी सल्याच्या विरोधात कारवाया करीत होता. त्यावेळीही त्याचा आणि सल्याचा वेळोवेळी खटका उडाला होता. मात्र, सरळ सल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न अभिनंदन झेंडेने त्यापुर्वी कधीच केला नव्हता. २९ आॅक्टोबर २००९ रोजी मात्र त्याने सल्याचा ‘गेम’ करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यातून सल्या बचावला; पण काही पोलीस अधिकारी जखमी
झाले.
सल्या व अभिनंदन झेंडे यांच्यातील ही वर्चस्ववादाची लढाई तेथेच संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा सल्याला ‘टार्गेट’ करण्यात आले. ३० आॅगस्ट २०१३ रोजी सल्या कऱ्हाडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आला असताना त्याच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये सल्या गंभीर जखमी झाला. त्यानंतर आजही सल्यावर औषधोपचार सुरू आहेत. संबंधित गोळीबार प्रकरणात पोलिसांनी नऊजणांना अटक केली होती. त्या टोळीमध्ये कऱ्हाडातील सल्याच्या जुन्या विरोधकासह कोपर्डे हवेलीतील काही युवकांचाही समावेश होता. वाळू व्यवसाय व वर्चस्ववादातून तो हल्ला झाल्याचे पोलीस तपासानंतर स्पष्ट झाले.
जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात सल्यावर झालेल्या त्या जिवघेण्या हल्ल्यानंतर गत दोन वर्षात शहरातील गुन्हेगारी कारवाया थंडावल्या होत्या. अंतर्गत धुसफूस सुरू असली तरी उघडपणे कोणतीही टोळी एकमेकासमोर आली नव्हती. तसेच सल्याच्या टोळीच्या कृत्यांनाही काहीप्रमाणात आळा बसला होता. असे असतानाच २० जुलै २०१५ रोजी शहरातील मंगळवार पेठेत सल्याचा साथिदार समजल्या जाणाऱ्या बाबर खानने बबलू मानेवर गोळ्या झाडल्या. बबलू माने याचा सल्यावर २००९ मध्ये झालेल्या हल्ल्यात हात होता. त्यामुळे बबलू मानेवर झालेला हा हल्ला म्हणजे टोळीयुद्धच असल्याचे स्पष्ट झाले.
बबलू माने खून प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत सहाजणांना अटक केली आहे. त्यामध्ये सल्याच्या मुलाचाही समावेश आहे. सल्याच्या या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कऱ्हाड शहर पोलिसांनी दिला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने टोळीवर आता मोक्कांतर्गत कारवाई होणार
आहे. (प्रतिनिधी)


३५ गंभीर गुन्हे दाखल
कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्यावर सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत सुमारे ३५ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये अपहरण, खुनाचा प्रयत्न, खून, दरोडा, गर्दी मारामारी, खंडणी यासह शासकिय नोकरावर हल्ला आदी गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. दिवंगत संजय पाटील खून प्रकरणासह अन्य काही गुन्ह्यात त्याची निर्दाेष मुक्तता झाली आहे.


२००९ पासून चर्चेत
कऱ्हाडात १९८९ ला मारामारीसारख्या गुन्ह्यातून सल्या चेप्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीला सुरूवात झाली. त्यानंतर अनेक वर्ष त्याने शहरात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला; पण २००९ साली संजय पाटील यांच्या खुनानंतर सल्या खऱ्याअर्थाने चर्चेत आला. कऱ्हाडच नव्हे सातारा, सांगली, कोल्हापुरसह अगदी पुणे जिल्ह्यातही त्याची दहशत निर्माण झाली.

१९९८ साली खुनाचा गुन्हा तीन वर्षांसाठी तडीपार
सल्यावर १९९८ साली खुनाचा गुन्हा नोंद झाला. तसेच २००४ साली दत्ता चव्हाण याच्यावर जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. २००४ सालात सल्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल झाले. तसेच २००५ व २००६ सालीही त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे आणखी दोन गुन्हे नोंदविण्यात आले.
वर्चस्ववादातून २००६ साली सल्याने दीपक सोळवंडेवर हल्ला केला. त्यावेळी तत्कालिन पोलीस निरीक्षक महादेव गावडे यांनी सल्याच्या तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविला. प्रांताधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मान्य करून सल्याला तीन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले होते.


सल्याशी निगडीत गुन्हेगारी घटना
१५ जानेवारी २००९ : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांची हत्या. या प्रकरणात सल्या चेप्या याच्यासह त्याच्या नऊ साथिदारांना सुरूवातीला अटक करण्यात आली.
५ मे २००९ : सातारच्या जिल्हा रूग्णालयात सल्यावर
गोळीबार.
२९ आॅक्टोबर २००९ : कऱ्हाडला जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात सल्या चेप्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये अभिनंदन झेंडे, बबलू मानेसह आठजणांना अटक झाली.
३० आॅगस्ट २०१३ : कऱ्हाडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सल्यावर बेछूट गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामध्ये सल्या गंभीर जखमी झाला. या प्रकरणामध्ये भानुदास धोत्रे याच्यासह त्याच्या साथिदारांना पोलिसांनी अटक केली.
२० जुलै २०१५ : सल्या चेप्याचा साथिदार समजल्या जाणाऱ्या बाबर खानने बबलू मानेवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये सल्याच्या मुलासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली.
२८ जुलै २०१५ : सल्यासह आठजणांच्या घरावर पोलिसांचे छापासत्र. सल्याच्या घरात पिस्तूल व जिवंत काडतुस आढळल्याने सल्यासह त्याची पत्नी शहनाज यांच्यावर गुन्हा दाखल करून शहनाजला पोलिसांनी अटक केली.


सल्याशी निगडीत गुन्हेगारी घटना
१५ जानेवारी २००९ : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांची हत्या. या प्रकरणात सल्या चेप्या याच्यासह त्याच्या नऊ साथिदारांना सुरूवातीला अटक करण्यात आली.
५ मे २००९ : सातारच्या जिल्हा रूग्णालयात सल्यावर
गोळीबार.
२९ आॅक्टोबर २००९ : कऱ्हाडला जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात सल्या चेप्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये अभिनंदन झेंडे, बबलू मानेसह आठजणांना अटक झाली.
३० आॅगस्ट २०१३ : कऱ्हाडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सल्यावर बेछूट गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामध्ये सल्या गंभीर जखमी झाला. या प्रकरणामध्ये भानुदास धोत्रे याच्यासह त्याच्या साथिदारांना पोलिसांनी अटक केली.
२० जुलै २०१५ : सल्या चेप्याचा साथिदार समजल्या जाणाऱ्या बाबर खानने बबलू मानेवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये सल्याच्या मुलासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली.
२८ जुलै २०१५ : सल्यासह आठजणांच्या घरावर पोलिसांचे छापासत्र. सल्याच्या घरात पिस्तूल व जिवंत काडतुस आढळल्याने सल्यासह त्याची पत्नी शहनाज यांच्यावर गुन्हा दाखल करून शहनाजला पोलिसांनी अटक केली.

Web Title: Seventh-bound Salain's 'mind game'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.