खंडाळा तालुक्यात सात हजारांवर कोरोनामुक्त....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:41 IST2021-05-18T04:41:52+5:302021-05-18T04:41:52+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आठ हजारांच्या वर पोहोचली आहे. ...

खंडाळा तालुक्यात सात हजारांवर कोरोनामुक्त....
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आठ हजारांच्या वर पोहोचली आहे. तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास हजारपार झाली असली तरी आजवर सुमारे सात हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याने तालुक्यात समाधान आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या थोडीशी घटल्याने तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
खंडाळा तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले असून, कोरोनाची एकूण संख्या साडेआठ हजारांवर पोहोचली आहे. सध्या हजारावर पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने मात्र बेड संख्या कमी पडत आहे. शिरवळ, खंडाळा, लोणंदसह अंदोरी, खेड बुद्रुक, विंग, वाघोशी, सुखेड, शेखमिरेवाडी, अहिरे, मोर्वे, पिंपरे, बाळूपाटलाचीवाडी या गावातून रुग्णसंख्या अधिक आढळल्याने इथली परिस्थिती बिकट होत आहे. या ठिकाणची व्यवस्था करताना स्थानिक समितीला कसरत करावी लागत आहे. मात्र, या परिस्थितीतही सात हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने समाधान आहे.
खंडाळा, लोणंद, शिरवळ या शहरी भागात पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला असला तरी ग्रामीण भागात निर्बंध पायदळी तुडविले जात आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. लोकांनीही स्वयंस्फूर्तीने नियम पाळणे आवश्यक आहे.
तालुक्यात एकूण ८५५७ रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी सात हजारांवर लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर हजारावर रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत. यापैकी बहुतांशी विलगीकरण कक्षात आहेत. तालुक्यात खासगी रुग्णालयातील काही व्हेंटिलेटर बेड सोडले तर इतर ठिकाणी ही सुविधा नाही.
कोट..
कोरोनातून सावरण्यासाठी प्रत्येक गावातून सर्वेक्षण सुरू आहे. आरोग्य सेविका, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांची ग्रामपातळीवर मेहनत अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यपद्धतीच्या जोरावरच कोरोनाला आळा घालणे शक्य होणार आहे. तालुका वैद्यकीय विभाग सर्वच पातळीवर लोकांसाठी अहोरात्र कष्ट घेत आहे.
-डॉ. अविनाश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी