सात दुकाने फोडली

By Admin | Updated: October 11, 2015 00:06 IST2015-10-11T00:06:21+5:302015-10-11T00:06:44+5:30

चोरीसत्र सुरूच : ओगलेवाडीत पुन्हा ‘चिल्लर’वर डल्ला

Seven shops broke down | सात दुकाने फोडली

सात दुकाने फोडली

कऱ्हाड : आगाशिवनगर येथे एका हॉटेलसह चार दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच ओगलेवाडीत शुक्रवारी रात्री चोरट्यांनी सात दुकाने फोडली. संबंधित दुकानातून चिल्लरसह काही माल लंपास केला. चोरट्यांनी उपनगरांना टार्गेट केल्यामुळे सध्या व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओगलेवाडी येथे शुक्रवारी रात्री मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी सलग सात दुकाने फोडली. सखी लेडी शॉपी अ‍ॅन्ड गिफ्ट गॅलरीचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. ड्राव्हरमधील चिल्लर त्यांनी गायब केली. त्यानंतर चोरट्यांनी शेजारचेच ‘लाजरी गिफ्ट गॅलरी’, ‘जानाई लॉटरी सेंटर’, ‘दुर्गा लेडिज टेलर्स’ व ‘हरिकला कृषी उद्योग’ या दुकानांकडे आपला मोर्चा वळविला. या सर्व दुकानांची शटर त्यांनी उचकटली. प्रत्येक दुकानातील साहित्य विस्कटूून त्यांनी रोकड गायब केली. हरिकला कृषी उद्योग दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे होते. या कॅमेऱ्यात दोन चोरटे दिसत आहेत. याच कॉम्लेक्समधील अंबिका स्वीट्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी चिल्लर पळविली. या शेजारी असलेले एस. डी. शेटे किराणा व भुसार मालाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरांनी दुकानात प्रवेश केला. आतील काऊंटरमधील अडीच हजारांची चिल्लर पळवली.
पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना सातही दुकानांची शटर उचकटल्याचे दिसले. यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एच. एन. काकंडकी यांनी चोरी झालेल्या दुकानांची पाहणी केली. सातारावरून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. श्वानपथकाने शेतातून जात कच्च्या रस्त्याने रेल्वेस्टेशनपर्यंत माग काढला. यावरून चोरटे रेल्वेने पसार झाले असावेत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ओगलेवाडी येथे चोरट्यांनी दुकाने फोडल्यानंतर शनिवारी दिवसभर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. (प्रतिनिधी)
चोरट्यांच्या दंडावर ‘टॅटू’
‘सखी लेडी शॉपी अ‍ॅन्ड गिफ्ट गॅलरी’ या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या असून, त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. चोरट्यांनी अंगात फक्त पँट परिधान केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. तसेच चोरट्यांच्या दंडावर टॅटू गोंदलेला आहे.

Web Title: Seven shops broke down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.