भाजप जिल्हाध्यक्षांच्या गाडीतील सात लाखांची रोकड जप्त
By Admin | Updated: October 14, 2014 23:21 IST2014-10-14T22:18:56+5:302014-10-14T23:21:34+5:30
साताऱ्यात पोलिसांची कारवाई : पक्षनिधी असल्याचा संबंधितांचा दावा

भाजप जिल्हाध्यक्षांच्या गाडीतील सात लाखांची रोकड जप्त
सातारा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ एक दिवस बाकी असतानाच भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या गाडीमध्ये तब्बल सात लाखांची रोकड सापडली. मात्र ही रक्कम पक्षनिधी असून त्याची रितसर कागदपत्रे असल्याचे पाटील यांनी पोलिसांना सांगितले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील सोमवारी दुपारी पोवईनाक्यावरून कारमधून कऱ्हाडकडे जात होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कारची झडती घेतली. त्यावेळी कारमध्ये सात लाखांची रोकड सापडली. ‘ही रोकड पक्षाने माझ्या खात्यावर पाठवली असून तशी बँकेमध्ये शहानिशा करावी,’ असे पाटील यांनी चौकशीत पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, जप्त केलेली ही रक्कम पोलिसांनी प्रांत कार्यालयात जमा केली आहे. बँक आॅफ महाराष्ट्र शाखेला पोलिसांनी पत्र दिले असून भरत पाटील यांच्या खात्यावरील सर्व माहिती द्यावी, असे पोलिसांनी पत्रात नमूद केले आहे. या रकमेबाबत पोलीस तपास करीत आहेत. मात्र अद्याप याबाबत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कसलीही नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)