निवड चाळीसची प्रत्यक्ष मात्र बाराच हजर !

By Admin | Updated: May 1, 2015 00:17 IST2015-04-30T21:24:45+5:302015-05-01T00:17:51+5:30

बारा सरपंचांच्या उपस्थितीत सरपंच समितीची बैठक : समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केले अनुपस्थितीबाबत आश्चर्य

Seven of the forty appeals to be present! | निवड चाळीसची प्रत्यक्ष मात्र बाराच हजर !

निवड चाळीसची प्रत्यक्ष मात्र बाराच हजर !

कऱ्हाड : गावातील अपूर्ण कामांबाबत, पिण्याच्या पाण्याच्या उद्भवणाऱ्या समस्यांबाबत विकास करता यावा म्हणून कऱ्हाड विकास गटांतर्गत २०१५-१६ च्या सरपंच समितीसाठी चाळीस गावांची निवड एक वर्षासाठी करण्यात आली. या सरपंच समितीच्या बोलावण्यात आलेल्या बैठकीस केवळ बाराच सरपंचांनी उपस्थिती लावल्यामुळे समितीच्या अध्यक्षांनीही सरपंचांच्या अनुपस्थितीबाबत आश्चर्य व्यक्त केले. या समितीचे महत्त्व तसेच गावातील अडचणी व समस्यांबाबत गांभीर्य नसलेल्या सरपंचाकडून उपस्थिती लावली न गेल्याने ही समिती कशासाठी स्थापन करण्यात आली आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०१५ - १६ या वर्षासाठी पंचायत समिती स्थरावर सरपंच समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसाठी लोकसंख्येच्या निकषानुसार चाळीस गावांची निवड करण्यात आली आहे. त्या गावातील सरपंचांनी आपल्या गावातील प्रश्न, अडचणी तसेच शासकीय कामाविषयी समस्या याविषयी महिन्यातून एकदा घेण्यात येणाऱ्या सरपंच समितीच्या बैठकीत मांडणे गरजेचे असणार आहे.
समितीची बैठक गुरुवारी कऱ्हाड येथे पंचायत समितीमध्ये पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कऱ्हाड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव होते. तसेच सचिव जयवंत दळवी यांची उपस्थिती होती.
लोकसंख्येच्या निकषानुसार निवडण्यात गावांमध्ये शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच कामांबाबत उदासीनतेमुळे की काय या बैठकीस बाराच गावांतील सरपंचांनी उपस्थिती लावली.
सरपंच समितीच्या बैठकीवेळी उपस्थिती लावलेल्या बारा गावांच्या सरपंचांना शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच बैठकीस उपस्थिती लावलेल्या सरपंचांनी आपल्या गावातील पाण्यांच्या, अतिक्रमाणाच्या तसेच ग्रामपंचायतींच्या करवसुलीविषयी उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. गावच्या सुधारणा, पाणीटंचाई आदी गोष्टींविषयी गावचा कारभार चालवणाऱ्या सरपंचांना गावाविषयी किती काळजी आहे हे यावरून दिसून आले. (प्रतिनिधी)


चाळीस गावांची निवड
२०१५- १६ या वर्षासाठी लोकसंख्येच्या निक षानुसार चाळीस गावांची निवड करण्यात आली आहे, त्यातून सरपंच समिती तयार करण्यात आली आहे. या सरपंच समितीचे तिसरे वर्ष असून, यंदाच्या वर्षी राजमाची, नारायणवाडी, बाबरमाची, खुबी, कापिल, गोंदी, किरपे, आणे, घारेवाडी, अबईचीवाडी, वस्ती साकुर्डी, पोतले, कुसूर, वसंतगड, येणके, म्होप्रे, केसे, साजूर, गोटेवाडी, मालखेड, शेवाळेवाडी, जिंती, येणपे, टाळगाव, नांदगाव, म्हासोली, संजयनगर, कालेटेक, जुने कवठे, हणबरवाडी, खराडे, रिसवड, पाडळी, शहापूर, वराडे, हिंगनोळे, तासवडे, अंधारवाडी, शिरगाव, शिवडे या गावांचा समावेश सरपंच समितीमध्ये करण्यात आला आहे.
कसे चालते सरपंच समितीचे कामकाज
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदीनुसार सरपंच समितीचे कार्य पाहिले जाते. त्यातून पंचायत समितीने पार पाडावयाच्या ग्रामपंचायतींच्या नियंत्रणविषयक व पर्यावरणविषयक कामांच्या संबंधित सर्व बाबींवर पंचायत समिती सल्ला देते. पंचायत समिती सरपंच समितीकडून देण्यात आलेल्या सल्ल्यावर विचार करून अंमलबजावणी करते.

Web Title: Seven of the forty appeals to be present!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.