सात कारखाने बंद; उर्वरित महिनाभर सुरू

By Admin | Updated: April 6, 2016 00:23 IST2016-04-05T22:54:31+5:302016-04-06T00:23:54+5:30

३ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक : कडक उन्हाचा होतोय गाळपावर परिणाम

Seven factories closed; Continue for a month remaining | सात कारखाने बंद; उर्वरित महिनाभर सुरू

सात कारखाने बंद; उर्वरित महिनाभर सुरू

वाठार स्टेशन : वाढत्या साखर कारखानदारीमुळे यंदाच्या ऊस गाळप हंगामाचा समारोप एप्रिलअखेर होत आहे. वेळेत सुरू झालेल्या साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत जवळपास ७३ लाख ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. सात कारखान्यांचे गाळप उसाअभावी बंद झाले आहे. तर शिल्लक ३ लाख मेट्रिक टन ऊस तोडण्याचे आव्हान उरलेल्या सात कारखान्यांपुढे आहे. ३० एप्रिलपर्यंत या संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण होईल, अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून मिळाली आहे.
या हंगामात उसाचे क्षेत्र गेल्यावर्षी एवढेच असल्याने जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप मेअखेर पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, जिल्ह्यातील बहुतांशी भागात दुष्काळी परिस्थिती व पावसाने ओढ दिल्याने उसाचे सरासरी उत्पादनही कमी झाले आहे.
या हंगामात दोन नवीन कारखानेही सुरू झाल्याने ऊस गाळपाचा वेग वाढला. याचाच परिणाम म्हणून या हंगामात वेळेत उसाचे क्षेत्र संपवण्याचे काम झाले. शिल्लक ऊसही महिन्याभरात संपवण्याचे काम कारखान्याकडून पूर्ण होईल; परंतु सद्य:स्थितीत वाढत्या उन्हाचा परिणाम ऊसतोडणी यंत्रणेवर होत आहे. बहुतांशी कारखाने क्षमतेपेक्षा कमी गाळप करू लागले आहेत. ऊसतोड मजुरांनाही आता परतीचे वेध लागल्यामुळे हे मजूर ऊस पेटवूनच आता तोड करू लागले आहेत.
जिल्ह्यात गेल्या वर्षीपर्यंत १३ कारखाने गाळप करत होते. या हंगामात स्वराज व शरयू हे दोन कारखाने नव्याने सुरूझाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ झाली. आत्ता अंतिम टप्पा किसन वीर कारखान्याच्या पुढाकाराने खंडाळा तालुक्यातील कारखान्याचाही चाचणी गाळप हंगाम आता सुरू होणार आहे. पुढील वर्षी जिल्ह्यात १६ कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज होणार आहेत.
हा हंगाम यशस्वी ठरला असला तरी पुढील गाळप हंगाम मात्र कारखान्यासाठी आव्हानात्मक राहणार आहे. पुढील हंगामात सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका उसाच्या पिकावर बसला आहे. काही तालुके वगळता अनेक तालुक्यांत आडसालीखालील लागण क्षेत्र अत्यल्प आहे. सध्याचा खोडवा ठेवण्यास शेतकरी तयार नसल्याने पुढील हंगामात उसाची सर्वात मोठी पळवापळवी होणार आहे. यात जे कारखाने या हंगामात समाधानकारक दर देतील त्यानांना पुढील
हंगामात ऊस घालण्याची
मानसिकता शेतकऱ्यांची राहणार आहे. (वार्ताहर)


लवकर तोडीसाठी फड पेटविले
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागल्याने ऊसतोडणीचे कामगारांचे हाल होऊ लागले आहे. यामुळे पहाटेच्या सुमारासच हे मजूर शेतात जाऊन ऊसतोडणीचे काम करत आहेत. तर लवकर ऊसतोडण्यासाठी उभ्या उसालाच काडी लावण्याचेही प्रकार अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यातील ही परिस्थिती मात्र पुढील हंगामात शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार आहे. पुढील हंगामात कारखानदारांना शेतकऱ्याच्या घरी यावे लागणार आहे.

Web Title: Seven factories closed; Continue for a month remaining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.