सेवागिरी यात्रा जबाबदारीने पार पाडा

By Admin | Updated: December 12, 2014 23:40 IST2014-12-12T21:43:19+5:302014-12-12T23:40:31+5:30

आढावा बैठक : अश्विन मुदगल यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

Servegiri Yatra responsibly | सेवागिरी यात्रा जबाबदारीने पार पाडा

सेवागिरी यात्रा जबाबदारीने पार पाडा

पुसेगाव : पुसेगाव यात्रेशी संबंधित शासनाच्या सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून यात्रेकरूंना अधिकाधिक सेवा सुविधा पुरवाव्यात. सध्या पुरेसा पाणीसाठा असला तरी पाण्याचे प्रदूषण टाळून शुध्द पाणीपुरवठा करावा. या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केल्यास गुन्हेगारीला पायबंद बसण्यास मदत होईल, अशा सूचना देत यात्रा जबाबदारीने पार पाडावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
पुसेगाव, ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त १६ ते २६ डिसेंबर या कालावधीत यात्रा भरविण्यात येणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी येथील नारायणगिरी सभागृहात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली व श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी प्रांत मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पखाले, तहसीलदार विवेक साळुंखे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, सरपंच मंगल जाधव, उपसरपंच संदीप जाधव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
वाहतुकीत बदल :
यात्रा कालावधीत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, वहातुकीची कोंडी टाळण्यासाठी साताऱ्याहून दहिवडीकडे जाणाऱ्या गाड्या नेर मार्गे तर दहिवडी व वडूजकडून सातारकडे जाणाऱ्या गाड्या विसापूर, खातगुण, जाखणगाव व चौकीचा आंबा मार्गे जाण्याचे नियोजन केले आहे. या शिवाय दि. २० व २१ रोजी पुसेगावमध्ये कोणतेही वाहन आत येऊ दिले जाणार नाही. ‘नो पार्किंग’ झोन ही तयार करण्यात आला आहे.

यात्रेत यंदा :-
गतवर्षी पेक्षा २५टक्के अधिक पोलीस बंदोबस्त
वाहतूक व्यवस्थेत बदल
मंदिर परिसर व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
फलकांना बंदी
रथमार्गातील सर्व अडथळे दूर होणार
परिवहनकडून भाविकांसाठी १४५ ज्यादा गाड्या
अखंड वीजपुरवठा
रथयात्रेदिवशी अ‍ॅमगार्डची स्वतंत्र व्यवस्था
शुद्ध पाणीपुरवठा
आरोग्य कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पथके
ज्यादा रुग्णवाहिका

Web Title: Servegiri Yatra responsibly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.