गैरव्यवहार करणाऱ्यांना घरी पाठवा
By Admin | Updated: July 23, 2014 22:31 IST2014-07-23T22:20:40+5:302014-07-23T22:31:01+5:30
दिवाकर रावते : ‘माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र’ अभियानात सरकारवर हल्लाबोल

गैरव्यवहार करणाऱ्यांना घरी पाठवा
लोणंद : ‘मागील पंधरा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने हजारो कोटी रुपयांचे गैरव्यवहार केले आहेत. विविध योजनांचा व सिंचनांचा पैसा खाणाऱ्या भ्रष्टाचारी सरकारला घरी पाठवा,’ अशा शब्दांत शिवसेनेचे संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
‘माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र अभियानांतर्गत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, वाई विधानसभा संपर्कप्रमुख मिलिंद घनगुटकर, नरेंद्र पाटील, हर्षद कदम, हनुमंत चवरे, महिला जिल्हा संघटक शारदा जाधव, प्रदीप माने आदी उपस्थित होते.
‘महाराष्ट्रात अनेक विकासकामे, प्रकल्प, सिंचनाचे प्रकल्प निधी नसल्याने अपूर्ण आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च करूनही सिंचन क्षेत्रात वाढ झाली नाही,’ असे रावते यांनी सांगितले.
विजय शिवतारे म्हणाले, ‘नीरा-देवघर धरणाचे पाणी द्यावे लागेल म्हणून गेली १५ ते २० वर्षे या सरकारने लोकांना पाण्यासाठी झुलवीत ठेवले. त्यांना पाणी पळवायचे होते. आपल्याला नीरा-देवघरचे पाणी मिळवायचे आहे. ‘घर तेथे शिवसैनिक’ ही संकल्पना राबवून यासाठी एकजूट करावी.’ संतोष पवार, सुनील यादव, हेमंत पवार, रवींद्र क्षीरसागर, संतोष मुसळे, मनीष इंगळे, गणेश जाधव, संपत मगर, दत्ता ठोंबरे, सचिन चव्हाण, गणेश पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)