पर्यायी जमिनीचे वाटप न झाल्यास आत्मदहन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:34+5:302021-03-23T04:41:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माण तालुक्यातील पळशी येथील पर्यायी जमिनीच्या बदली प्रस्तावासंदर्भात गट नं. १७९२, गट नं. ४० ...

पर्यायी जमिनीचे वाटप न झाल्यास आत्मदहन करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : माण तालुक्यातील पळशी येथील पर्यायी जमिनीच्या बदली प्रस्तावासंदर्भात गट नं. १७९२, गट नं. ४० क्षेत्राचे चुकीचे आदेश काढले आहेत. यात गावचे काहीजण सहभागी असून तत्काळ पर्यायी जमिनीचे वाटप योग्य पद्धतीने न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात दि. २९ रोजी सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा उरमोडी प्रकल्पग्रस्त दीपक देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
देवरे म्हणाले, उरमोडी जलाशयात माझ्या मालकीची जवळपास साडेचार एकर जमीन १९९७ ला गेली. त्याला पर्याय जमिनी पळशी (ता. माण) येथे देण्याचा शासन निर्णय झाला होता. गट नं. १७९२ गटातील १ हेक्टर २० आर क्षेत्राचे वाटप झाले. मात्र, संकलन पत्रात २ हेक्टर २६ आर क्षेत्राचे वाटप असताना गट क्र. ४० मधील केवळ १ हेक्टर २० आर क्षेत्राची नजरचुकीने नोंद झाली. त्यामुळे सुमारे एक हेक्टर क्षेत्र आम्हा कुटुंबीयांना कमी मिळाले आहे. संकलन पत्राच्या दुरुस्तीसाठी गेले तीन वर्ष शासन दरबारी संघर्ष केल्यावर संकलन पत्र दुरुस्त झाले. प्राप्त जमिनीच्या वाटपासाठी प्रांत सातारा यांना अर्ज केला असताना जमीन शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले. पुन्हा महसूल दप्तरी संघर्ष करून ४० आर जमिनीचा आदेश मिळवून पळशी येथे जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेलो असता अनोळखी पस्तीस ते चाळीस व्यक्तींनी घेरून जिवे मारण्याची धमकी दिली. परिणामी, म्हसवड पोलिसांचे संरक्षण घेण्याची वेळ आली. तलाठी, मंडलाधिकारी व सर्वेअर यांनी त्या जमिनीची नोंद काशीनाथ सखाराम लोटेकर यांच्या नावे पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात घातल्याचा आरोप देवरे यांनी केला.