दोन दिवसांत नव्या सभापतींची निवड
By Admin | Updated: March 7, 2016 00:40 IST2016-03-06T22:50:02+5:302016-03-07T00:40:21+5:30
राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय : जि.प. उपाध्यक्षांबाबत मौन

दोन दिवसांत नव्या सभापतींची निवड
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या चारही सभापतींनी राजीनामा दिल्याने या जागेवर इच्छुकांची चाचपणी करून येत्या काही दिवसांत नव्या सभापतींची निवड जाहीर केली जाईल, असा निर्णय रविवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, उपाध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत सदस्यांनी ‘अळीमिळी गूपचिळी’ धोरणच अवलंबिले.
जिल्हा परिषदेमध्ये अर्थसंकल्प सभेच्या वेळी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत गटबाजी दिसून आल्याने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अध्यक्षांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी राष्ट्रवादीची बैठक बोलाविली. या बैठकीत नव्या सभापतींच्या निवडीबरोबरच सदस्यांना ‘गटबाजी न करता एकीने काम करा,’ असा सबुरीचा सल्लाही रामराजेंनी दिला. पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत बंड सुरू झाल्याने राष्ट्रवादीला ग्रहण लागले आहे. इतर सभापतींचे राजीनामे घेतले आहेत; मात्र उपाध्यक्षांच्या राजीनामा लटकल्याने राष्ट्रवादीच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच जिल्हा परिषद अर्थसंकल्पाची सभा गटबाजीमुळे तहकूब करण्यात आली. एकीकडे बंडखोर शांत झाले असल्याचे दिसत असले, तरी दुसरीकडे त्यांची नाराजी मात्र दूर झालेली दिसून येत नाही. त्यामुळेच रामराजेंनी रविवारी अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक बोलाविली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. राष्ट्रवादीमध्ये गटबाजी अशीच सुरू राहिली तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे पहिल्यांदा गटबाजी थांबवा आणि एकीने काम करा, असा सल्लाही यावेळी रामराजेंनी सदस्यांना दिला. (प्रतिनिधी)