वनस्पतींवरून डोंगरकड्यात पाण्याचा शोध!
By Admin | Updated: May 25, 2016 00:52 IST2016-05-25T00:51:47+5:302016-05-25T00:52:59+5:30
३५ वर्षांत ५ झरे हुडकले : कास पठाराच्या आखाडेवाडीतील आबालवृद्धांनी एकत्र येऊन केली पाणीटंचाईवर मात - लोकमत जलमित्र अभियान

वनस्पतींवरून डोंगरकड्यात पाण्याचा शोध!
सागर चव्हाण -- पेट्री
कास पठारावर नानाविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. वेगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे लोकांमध्ये त्यांची ओळख असते. विविध आजारांवर गुणकारी ठरणाऱ्या औषधी वनस्पती, तसेच विषारी वनस्पती स्थानिक लोक चांगल्या प्रकारे ओळखतात. त्याचा ते वापरही करतात. अशाचप्रकारे डोंगरी वनस्पतींवरून पाण्याचा शोध लावण्यातही कुसुंगी मुरा येथील नागरिकांनी लावला आहे.
कास डोंगरमाथ्यावर १५ ते २० उंबऱ्यांची आखाडेवाडी ही छोटी लोकवस्ती आहे. येथील लोकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी डोंगर पालथे घालावे लागतात. ही पायपीट गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासूनच सुरू होता. डोंगरकपारीत ज्याठिकाणी बारी, रेंडागी, कापसी या वनस्पती जेथे असतील ते हमखास पाणी असते, हा येथील लोकांचा पुर्वानुभव असल्याने लोक डोंगरकपारीत फिरून ज्याठिकाणी या वनस्पती असतील, ओलावा असेल, तेथे खुदाई करत. महिनोमहिने श्रमदान केल्यानंतर त्यांना पाण्याचा शोध लागते असे. असे पाच झरे त्यांनी याप्रकारे शोधून काढले आहेत.
काळ्याकभिन्न कातळाला फोडला पाझर
कास पठारावरील आखाडेवाडीला उन्हाळ्यात तीव्रपाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. खडकाळ जमीन असल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे दरवर्षी पाण्यासाठी भटकंती ठरलेली होती. यासाठी गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून येथील रहिवाशांनी डोंगरकपारीत फिरून काळ्याकभिन्न दगड फोडून पाण्याचा शोध लावत आहेत. आजपर्यंत त्यांनी पाच पाण्याचे झरे श्रमदानातून तयार केले आहेत. त्याला पाणीही लागले आहे.