कासची फुलं पाहताय? 100 रुपये काढा!

By Admin | Updated: August 2, 2016 00:59 IST2016-08-02T00:40:13+5:302016-08-02T00:59:57+5:30

यंदाच्या हंगामातील तिकीट दर जाहीर : पर्यटकांची पावले लागली वळू; तृण, कंद, वेली, आर्किड फुलांचा हंगाम सुरू

Seeing the flowers of the castle? Get 100 bucks! | कासची फुलं पाहताय? 100 रुपये काढा!

कासची फुलं पाहताय? 100 रुपये काढा!

सातारा / पेट्री : वरचेवर लोकप्रिय होत चाललेले कासपठार आता महागडेही बनले आहे. यंदाच्या हंगामात सुट्टीच्या दिवशी कासची फुलं पाहण्यासाठी दरडोई तब्बल १०० रुपये मोजावे लागणार असून ज्येष्ठ नागरिकांना मात्र प्रवेश शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. तसेच वाहनांच्या पार्किंगचेही दर वाढविण्याचा निर्णय वनखात्याच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
कास पुष्प पठाराचे नैसर्गिक सौंदर्य कायमस्वरूपी जपण्यासाठी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच साताऱ्यात बैठक झाली. या बैठकीस पर्यावरण तज्ज्ञ आणि पर्यावरण संस्थेशी संबंधित सदस्य उपस्थित होते. १० आॅगस्टपासून कास फुलांचा हंगाम सुरू होत असून शनिवार, रविवार व शासकीय सुट्टी दिवशी जास्तीत जास्त तीन तासांसाठी १२ वर्षांवरील सर्वांना प्रतिव्यक्ती १०० रुपये फी आकारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. इतर दिवशी हाच दर ५० रुपये असणार आहे. दुचाकी वाहनांना १० रुपये, चारचाकी वाहनांना ५० रुपये तर मिनीबससह सर्व मोठ्या वाहनांना १०० रुपये प्रति चार तास असा दर आकारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
कॅमेराशुल्क तीन तासांसाठी १०० रुपये तर गाईडशुल्क १० व्यक्तींकरिता १०० रुपये असेही दर पुष्पप्रेमींसाठी आकारण्यात येणार आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना प्रवेशशुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)


कासवर फुलांच्या बहराला प्रारंभ
पेट्री : कास पठार फुलांनी बहरण्यास सुरुवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच परराज्यातून पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. या पठाराचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे जून ते आॅक्टोबर महिन्यादरम्यान तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक अशा निळ्या, जांभळ्या, लाल, पांढऱ्या रंगांची फुले येतात. मध्य आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मीळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. या पठारावरील सुंदर अशा विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो. सध्या पांढऱ्या रंगांची फुले तुरळक स्वरूपात येण्यास सुरुवात झाली असल्याने पर्यटक कुटुंबासमवेत दाट धुक्यांसह पावसाळा ऋतूचा आनंद घेत आहेत.


वजराईला पोलिस अधिकाऱ्यांची भेट
वजराई धबधब्यावरून कास आणि भांबवली या गावांमध्ये रस्सीखेच सुरू असली तरी कास परिसरात पर्यटकांची कोणतीही फसवणूक होत नसल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल किर्दत यांनी दिली.
देशातील सर्वात उंच असलेल्या वजराई धबधब्यासाठी कास आणि भांबवली ग्रामस्थांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. कास मंदिराजवळ ‘कास वजराई धबधबा’ असा फलक लावून पर्यटकांची कोणतीही फसवणूक होत नसून याबाबत मेढा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही समक्ष भेट देऊन वास्तवातील सर्व माहिती जाणून घेतली आहे. तरी पर्यटकांनी बिनधास्तपणे या परिसराचा लाभ घ्यावा, असे आवाहन किर्दत यांनी केले आहे.

Web Title: Seeing the flowers of the castle? Get 100 bucks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.