जगदीश कोष्टी - सातारा -: जीवा महाले स्मारक हे दहा वर्षांपूर्वीच मंजूर झाले आहे. त्यासाठी प्रतापगडावरील जागा दोन वेळा सुचविली गेली; परंतु ही जागा वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने परवानगीप्रक्रिया खूप किचकट असल्याने शेवटी जिल्हा प्रशासनाने प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या वाडा कुंभरोशी येथील जागा सुचविली आहे. तिची अशासकीय सदस्य मंगळवारी पाहणी करणार आहेत.प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखानाच्या वधाच्या वेळी शिवरायांवरील वार हातावर झेलत सय्यद बंडाचा खातमा करणारे वीर जीवा महाले हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहेत. पुढच्या पिढीला त्यांचे स्मरण व्हावे, यासाठी वीर जीवा महाले यांचे स्मारक प्रतापगडावर व्हावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी २००४ मध्येच स्मारक मंजूर केले होते. त्यानंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी दोन कोटी ७५ हजारांचा निधीही मंजूर केला होता. मात्र, स्मारक काही तयार झाले नाही. स्मारकाच्या मागणीसाठी जीवा सेनाच्या नेतृत्त्वाखाली अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. स्मारकासाठी प्रथम प्रतापगडावर शिवरायांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला, तर त्यानंतर आॅक्टोबर २०१३ मध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या पश्चिम दिशेला दुसरी जागा सुचविली गेली होती. तरीही स्मारकाचा प्रश्न काही सुटला नाही. प्रतागडावरील जागा ही वनखात्याच्या हद्दीत येते, त्यामुळे तेथे स्मारक बांधताना नागपूरहून परवानगी घ्यावी लागते. हा प्रस्ताव मंजुरीसाठी नागपूरहून दिल्ली व्हाया भोपाळ पाठवावा लागतो. यासाठी किती कालावधी लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या वाडा कुंभरोशी येथील जागा सुचविली गेली आहे. नवा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी एक जागा पसंत केली होती. मात्र, पुढे काय झाले याची कल्पना नाही.- धोडिंबा जाधव, अशासकीय सदस्य,वीर जीवा महाले स्मारक समितीआठ वर्षांनंतर पहिलीच बैठकजीवा महालेंचे स्मारक प्रशासकीय अन् लोकप्रतिनिधींच्या अनास्थेत कायम सापडले आहे. जीवा महाले स्मारक समितीची स्थापना ३ आॅगस्ट २००५ रोजी झाली. या समितीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री असतात. त्यावेळी समितीच्या अध्यक्षस्थानी रामराजे नाईक-निंबाळकर होते. मात्र, समितीच्या स्थापनेनंतर आठ वर्षे बैठकच झाली नाही. माजी मंत्री शशिकांत शिंदे पालकमंत्री झाल्यानंतर पहिली बैठक १८ आॅक्टोबर २०१३ रोजी झाली, असा आरोप जीवा सेनेचे अध्यक्ष नंदकुमार खरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.स्मारकासाठी निधी व आराखडा तयार आहे. त्यामुळे स्मारक लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. त्यासाठी मंगळवार, दि. १६ रोजी महाबळेश्वरला भेट देऊन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याशी चर्चा करणार आहे.- अशोक जाधव, अशासकीय सदस्य
प्रतापगडच्या पायथ्याशी आज जागा पाहणार
By admin | Updated: December 16, 2014 00:03 IST