सैदापुरात चोरट्यांनी दोन घरे फोडली

By Admin | Updated: February 2, 2016 00:58 IST2016-02-02T00:58:52+5:302016-02-02T00:58:52+5:30

सैदापुरातील घटना : कुटुंबीय विवाहाला जाताच मारला डल्ला

In Sedapura the thieves broke into two houses | सैदापुरात चोरट्यांनी दोन घरे फोडली

सैदापुरात चोरट्यांनी दोन घरे फोडली

कऱ्हाड : घरातील सर्वजण विवाह समारंभासाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन घरे फोडली. संबंधित घरातून सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. सैदापूर येथे रविवारी भरदिवसा ही घटना घडली. याबाबत सागर जगन्नाथ जाधव यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर येथे वास्तव्यास असणाऱ्या सागर जाधव यांच्या चुलत बहिणीचा विवाह रविवारी दुपारी गजानन हौसिंंग सोसायटीमधील समर्थ मल्टिपर्पज हॉलमध्ये होता. त्यामुळे सागर जाधव यांच्यासह संपूर्ण जाधव कुटुंबीय तसेच आसपासचे लोक घरांना कुलूप लावून हॉलमध्ये गेले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक नातेवाईक कामानिमित्त घरी आला होता. नंतर तो कुलूप लावून लग्न कार्यालयात गेला. तोपर्यंत सर्व सुरळीत होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विवाह समारंभ आटोपून जाधव कुटुंबीय घरी परतले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा अर्धवट अवस्थेत उघडल्याचे दिसून आले. तसेच कडी-कोयंडा कटावणीसारख्या हत्याराने उचकटल्याचे पाहून घरात चोरी झाल्याची कल्पना सागर जाधव यांना आली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सागर जाधव यांच्यासह त्यांच्या चुलत्याच्या घरातून चोरट्यांनी ७० हजारांच्या रोख रकमेसह साडेसात ग्रॅमची सोन्याची चैन, सहा ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, चार ग्रॅमचे दोन टॉप्स, बारा ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, अंगठ्या असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला आहे. सागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कऱ्हाड शहर पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: In Sedapura the thieves broke into two houses