‘सेकंड इनिंग’मुळे पुन्हा काळजात ‘धस्स्’!
By Admin | Updated: April 29, 2016 00:26 IST2016-04-28T21:33:21+5:302016-04-29T00:26:56+5:30
कऱ्हाडात गुन्हेगारांचे धाबे दणाणले : गुन्हे प्रकटीकरण होणार ‘चार्ज’; पोलिस ठाण्यातही कामचुकारांना शिस्तीचा डोस

‘सेकंड इनिंग’मुळे पुन्हा काळजात ‘धस्स्’!
कऱ्हाड : ‘दिसतं तसं नसतं’ असं म्हणतात. येथील शहर पोलिस ठाण्यातही काही ‘सिंघम स्टाईल’ अधिकारी होऊन गेलेत; पण स्टाईल सिंघम असली तरी त्यातील ‘खटक्यावर बोट’ ठेवणारे अधिकारी विरळचं. सध्या पोलिस ठाण्याचा पदभार निरीक्षक विकास धस यांनी स्वीकारलाय. धस यांची कऱ्हाडातली ही ‘सेकंड इनिंग’. यापूर्वी त्यांनी येथे अनेकवेळा ‘खटक्यावर बोट’ ठेवलंय. अनेकांना पलटीही केलंय. त्यामुळे त्यांच्या या ‘सेकंड इनिंग’चा गुन्हेगारांनी चांगलाच ‘धस’का घेतलाय.
कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदाची खुर्ची म्हणजे ‘हॉटसीट’. आजपर्यंत या खुर्चीवर अनेक अधिकारी बसले. त्यातील काहींनी मिळालेल्या संधीच सोनं केलं; पण काहींना या ‘हॉट’ खुर्चीचा चांगलाच ‘चटका’ बसला. कायदा, सुव्यवस्था राबवताना ते स्वत:च वादात सापडले. ‘तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ’ ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचेही कधीकधी येथे हात भाजलेत. काही वर्षांपूर्वी वरिष्ठ निरीक्षकपदी मुरलीधर मुळूक असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेत सहायक निरीक्षक विकास धस होते. त्यावेळी गुन्हे शाखा चांगलीच ‘फॉर्मात’ होती. शाखेच्या कार्यालयात अनेक गुन्हेगार सूतासारखे सरळ झाले. गल्लीदादांचीही तेथे बोलती बंद झाली आणि अनेकांची दादागिरीही तेथेच संपुष्टात आली.
कालांतराने निरीक्षक मुळूक व सहायक निरीक्षक धस यांची बदली झाली. त्यानंतरच्या अधिकाऱ्यांनी शहरात कायदा, सुव्यवस्था राबवताना गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये त्यांना म्हणावे तेवढे यश आले नाही. मध्यंतरीच्या कालावधीत सहायक निरीक्षक धस यांना पदोन्नती मिळाली. २०१२ ते २०१४ या कालावधीत त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात काम केले. त्यानंतर काही दिवस पाटण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पानसरे खून प्रकरणाच्या तपास पथकातही त्यांची नेमणूक करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी त्यांची सातारला बदली होऊन त्यांना कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली. धस यांनी येथील पदभार स्वीकारताच ठाण्यांतर्गत आवश्यक असणारे बदल केलेत. कामचुकारांचे कान टोचण्याबरोबरच कामाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ठिकाणी नेमणूक देण्याचा
त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
फुकटचा फौजदार अखेर ‘आऊट’
पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेची ‘फौजदार’की गत काही दिवसांपासून चर्चेत होती. येथील कर्मचारी शहरातील वाहतुकीवर लक्ष देण्याऐवजी चकाट्या पिटण्यातच धन्यता मानत होते. उंदराला मांजराची साक्ष, असाच काहीसा प्रकार या शाखेत सुरू होता. निरीक्षक धस यांनी पदभार स्वीकारताच वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना शिस्तीचे डोस देण्यास सुरुवात केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल खोंडे यांना या शाखेची जबाबदारी देण्यात आली असल्याचे समजते.
वचक निर्माण
करण्याचे आव्हान
शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. या वाढत्या गुन्हेगारी कारवाया व गुन्हेगारांचे वाढते वलय रोखण्याचे आव्हान सध्या निरीक्षक धस यांच्यासमोर आहे. त्यासाठी त्यांना गुन्हे प्रकटीकरण शाखा चार्ज करावी लागणार असून, त्यादृष्टीने त्यांनी सहायक निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्याशी चर्चा केली आहे.