‘स्वच्छ ग्राम’ स्पर्धेत विभागात जखिणवाडीचा दुसरा क्रमांक
By Admin | Updated: August 9, 2014 00:28 IST2014-08-09T00:04:13+5:302014-08-09T00:28:55+5:30
ग्रामस्थांचा आनंदोत्सव : गावाच्या शिरपेचात आणखी एक तुरा

‘स्वच्छ ग्राम’ स्पर्धेत विभागात जखिणवाडीचा दुसरा क्रमांक
कऱ्हाड : संत तुकडोजी महाराज ‘स्वच्छ ग्राम’ स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या जखिणवाडी, ता. कऱ्हाड गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गावाने याच स्पर्धेत पुणे विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला असून, निकाल जाहीर झाल्यानंतर गुरुवारी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला.
जखिणवाडी ग्रामस्थांनी स्वच्छतेतील सातत्य व एकीच्या बळावर तंटामुक्त गाव, आदर्श गाव असे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. तसेच संत तुकडोजी महाराज ‘स्वच्छ ग्राम’ स्पर्धेत या गावाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या गावांना पुणे विभागीय स्पर्धेसाठी संधी मिळते. पुणे विभागीय स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर अशा पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन याप्रमाणे दहा गावांचा या स्पर्धेत सहभाग आहे. स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या जखिणवाडी गावाची नुकतीच विभागीय समितीकडून पाहणी करण्यात आली होती. त्याचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. निकालानुसार जखिणवाडी गावाने या स्पर्धेत पुणे विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला असून, आठ लाखांचे बक्षीस मिळवले आहे. या यशाच्या जोरावर जखिणवाडी गाव राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहे. (प्रतिनिधी)
दरवर्षी पुरस्कार
नरेंद्र नांगरे-पाटील यांनी गावाच्या सरपंचपदाची धुरा सांभाळल्यापासून या गावाने अनेक उपक्रमांत सहभागी होत पुरस्कार पटकावले आहेत. २०१० साली या गावाला निर्मल ग्राम, २०१२ मध्ये तंटामुक्त गाव, २०१३ मध्ये पंचायत राज, वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन, २०१४ मध्ये विकासरत्न, स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम तर विभागात द्वितीय पुरस्कार पटकावला. तसेच गौरव ग्रामसभा स्पर्धेस पात्र ठरल्यामुळे गावाचा लौकिक आणखीनच वाढला आहे.