मूर्तिकार साकारताहेत विघ्नहर्त्याची विविध रुपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST2021-08-14T04:43:50+5:302021-08-14T04:43:50+5:30

सणबूर : गणेशोत्सवाला अवघ्या एक महिन्याचा अवधी राहिल्याने मंद्रुळकोळे खुर्द (ता. पाटण) येथील कुंभारवाड्यात मूर्ती कारागिरांकडून विविध आकारातील गणेशमूर्ती ...

Sculptors are embodying various forms of disruption | मूर्तिकार साकारताहेत विघ्नहर्त्याची विविध रुपे

मूर्तिकार साकारताहेत विघ्नहर्त्याची विविध रुपे

सणबूर : गणेशोत्सवाला अवघ्या एक महिन्याचा अवधी राहिल्याने मंद्रुळकोळे खुर्द (ता. पाटण) येथील कुंभारवाड्यात मूर्ती कारागिरांकडून विविध आकारातील गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरवर्षी महिनाभर अगोदर भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उत्सवासाठी सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, अहमदनगर येथील मूर्ती दरवर्षी विक्रीसाठी येतात.

मंद्रुळकोळे खुर्द येथील कारागिरांनी तयार केलेल्या रेखीव मूर्तींना परिसरातील ग्राहकांकडून मोठी मागणी असते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती किमतीने जास्त मात्र वजनाने हलक्या असतात. त्यामुळे विसर्जन केल्यास त्या पाण्यातच तरंगतात. मूर्तीच्या रंगरंगोटीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामुळे पाणी दूषित होते. गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे गणेशमूर्तींची मागणी दरवर्षी वाढत आहे. सम्राट, टिटवाळा, नगरमांडी, छोटा शंख, मोठा दगडूशेठ, उंदीर, मोर, गरुडावर आरुढ झालेल्या मूर्ती अशा विविध आकारांतील गणेशमूर्ती सध्या कुंभारवाड्यात आकार घेत आहेत. मूर्ती तयार झाल्यानंतर ती सुकण्यास वेळ लागतो. त्यानंतर रंगकाम केले जाते. त्यामुळे दीड महिना अगोदर मूर्ती तयार करण्याचे काम कारागिरांकडून केले जाते.

- चौकट

कोरोनाचा पडतोय विसर

सर्वच सण आणि उत्सवांवर कोरोनाचे व अतिवृष्टीचे सावट असले तरी बाप्पांच्या आगमनाची गणेशभक्तांची आतुरता कमी झालेली नाही. बाप्पांचे आगमन होण्याच्या अगोदरपासूनच भक्तांना या उत्सवाचे वेध लागतात. बाप्पांच्या आगमनाला एक महिन्याचा अवधी आहे. मात्र, कुंभारवाड्यात साकारलेली विघ्नहर्त्याची विविध रुपे कोरोनाचा विसर पाडत आहेत.

(कोट)

आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. या व्यवसायात कुटुंबातील सर्वजण रात्रंदिवस काम करतात. मात्र, परराज्यातून विक्रीसाठी येणाऱ्या मूर्तींमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. स्थानिक व परिसरातील भाविक आमच्याकडूनच मूर्ती खरेदी करतात. सध्या आमच्याकडे दीड हजार मूर्ती तयार आहेत.

- सीताराम कुंभार, मूर्तिकार, मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण

फोटो : १३ केआरडी ०१

कॅप्शन : मंद्रुळकोळे खुर्द (ता. पाटण) येथे गणेशाच्या मूर्ती बनविण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. (छाया : बाळासाहेब रोडे)

Web Title: Sculptors are embodying various forms of disruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.