पालिकेच्या शाळांना मिळाला ‘सन्मान’ !

By Admin | Updated: November 1, 2015 00:04 IST2015-10-31T23:29:38+5:302015-11-01T00:04:39+5:30

कुठे आकर्षक कमान तर कुठे पाण्याची सुविधाही : पालिका प्रशासनाकडून शाळांची पाहणी ; समस्यांचा घेतला तत्काळ आढावा

Schools received 'honor'! | पालिकेच्या शाळांना मिळाला ‘सन्मान’ !

पालिकेच्या शाळांना मिळाला ‘सन्मान’ !

कऱ्हाड : कऱ्हाड नगरपरिषदेतील शाळांची गणती १ ते १२ अशी होते. यातील काही शाळांची अवस्था अडचण नसून खोळंबा अशी झाली होती. अनेक वर्षांपासून असुविधांच्या गर्तेत असलेल्या शाळांची खरी स्थिती ‘लोकमत’ने मांडली. शाळांचे खऱ्या अर्थाने पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही. ना पालिकेला शाळांची स्थिती बदलावी असे वाटत होते, ना प्रशासनाला. मात्र, या शाळांची स्थिती बदलण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला. अखेर या पुढाकाराला यश मिळाले. ‘लोकमत’ने मांडलेल्या वास्तव्यानंतर पालिका प्रशासनाने गांभीर्यपूर्व लक्ष देत शाळेतील स्थितीबाबत आढावा घेवून काही शाळांमध्ये सुविधा उभारण्यास सुरुवात केली आहे.
सोमवार पेठेतील प्रशस्त समजल्या जाणाऱ्या लोकवस्तीत पालिकेची शाळा क्रमांक चार आहे. या शाळेतील महत्त्वाची समस्या ही क्रीडांगणाची होती. तसेच शाळेची इमारत ही दगड मातीपासून बांधण्यात आली आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून नुकतीच पाहणी करण्यात आली आहे. शाळेसमोरील पाण्याच्या टाकीच्या बांधकामानंतर शाळेतील समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून शाळेतील मुख्याध्यापिकांना देण्यात येणार आहे. या शाळेला नवीन क्रीडांगण देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मार्केट यार्ड परिसरात पालिकेच्या शाळा क्रमांक ५ स्वत:ची जागाच नसल्याने ऊर्दू हायस्कूलच्या इमारतीत ही शाळा भरविली जाते. २८५ इतकी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. या शाळेतील इमारत, क्रीडांगण तसेच कंपाऊंडच्या प्रश्नाबाबत लवकरच मार्ग काढला जाईल, असे पालिकेकडून लेखी पत्राद्वारे शाळेतील शिक्षकांना कळविण्यात आले आहे.
शाळा क्रमांक अकरा मध्ये असलेल्या असुविधांबाबत शिक्षणमंडळ प्रशासनाकडून लेखी पत्र मागविण्यात आले आहे. या शाळेतील इमारतीच्या स्लॅब व मोडलेल्या खिडक्यांबाबत प्रशासनाकडून अहवालही मागविण्यात आला आहे. ‘लोकमत’ने मांडलेल्या प्रश्नांमुळे पालिका तसेच शिक्षणमंडळ प्रशासनाने शाळेतील समस्यांविषयी विचारणा केली असल्याचे शाळेतील मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले.
कऱ्हाड नगरपरिषदेतील १, ७ अन् १२ क्रमांकांच्या शाळा एकाच इमारतीत भरत आहेत. या शाळेत मोठ्या प्रमाणात गैरसुविधा निर्माण झाल्या होत्या. शाळेच्या खिडक्यांना दरवाजे, मुलांना बसण्यासाठी चांगली फरशी, बेंच नसल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांकडूनही शाळेत असुविधांविषयी कायम तक्रारी येत आहेत. शाळेच्या पाठिमागील बाजूस मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने साप अन् विंचवाची भीती निर्माण झाली होती. मात्र, आता शाळेभोवती आकर्षक कंपाऊं ड बांधण्यात आले आहे.
तसेच सभोवतालचे गवतही काढण्यात आले आहे. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शाळेतील असुविधांबाबत माहिती घेतल्याचे शाळेतील शिक्षकांकडून सांगण्यात आले. शनिवार पेठेत सुपर मार्केटच्या समोरच्या बाजूला सुमारे सव्वा एकर जागेत भव्य इमारतीत या तिन्ही शाळा भरतात. पालिकेच्या इतर सर्व शाळांच्या तुलनेत या शाळांना रस्त्यालगत सुमारे सव्वा एकर जागा, चांगली इमारत, प्रशस्त क्रीडांगण असल्याने क्रीडांगणावरील वाढलेले गवत काढण्याचे काम सध्या पालिका कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.
शिक्षक पुन्हा नियुक्तीच्या ठिकाणी
शाळा क्र. १० मधील मुख्य समस्या ही शिक्षकांसंबधीची होती. या शाळेतील शिक्षक हे पगार या शाळेचा घेत होते. आणि प्रत्यक्ष काम दुसऱ्या शाळेत करत होते. आता मात्र, प्रशासनाने शाळेतील ‘त्या’ शिक्षकाला पुन्हा या शाळेत घेण्याचे आश्वासन शाळेतील मुख्याध्यापिकांना दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तारेचे कंपाऊं ड
पालिकेतील शाळा १, ७ आणि १२ मध्ये शाळेच्या परिसरात बंदिस्त कंपाऊंड नव्हते. त्यामुळे या शाळेत रात्रीच्या वेळी अनोळखींकडून साहित्यांची तोडफोड केली जाते. आता मात्र, शाळेच्या सभोवताली आकर्षक तारेचे कंपाऊंड बांधण्यात आले आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटला आहे.

Web Title: Schools received 'honor'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.