जिल्ह्यातील शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:56+5:302021-02-05T09:18:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : अद्याप कोरोनाचे संकट संपलेले नसतानाही शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत. ...

जिल्ह्यातील शाळा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अद्याप कोरोनाचे संकट संपलेले नसतानाही शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र वरिष्ठ महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज अद्याप ऑनलाईन सुरू आहे. नववी ते दहावीपर्यंत शाळा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्यात आल्या असतानाच शासनाने पाचवी ते आठवीपर्यंतचेही वर्ग सुरू केले. वास्तविक वरिष्ठ महाविद्यालये सुरू करणे अपेक्षित असताना शाळा सुरू करण्याकडे शासनाचा कल आहे.
वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शाळकरी विद्यार्थी यांची प्रतिकार क्षमता यामध्ये फरक आहे. मात्र असे असतानाही अद्याप महाविद्यालयीन विद्यार्थी घरातच आहेत. यामुळे शाळकरी मुलांच्या पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र वरिष्ठ महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांनाही शासकीय आदेशाची प्रतीक्षा आहे. शासकीय आदेश प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज ऑफलाईन सुरू होणार आहे. युवकांचेही महाविद्यालये सुरू होण्याकडे लक्ष लागून राहिले आहे. वास्तविक शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. मार्च, एप्रिलमध्ये परीक्षा होत असल्याने प्रत्यक्ष अध्यापन अवघा एक महिनाच होणार आहे.
कोट :
अद्याप शासनाकडून महाविद्यालयांचे कामकाज ऑफलाईन सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे ऑनलाईनच अध्यापन करण्यात येत आहे. परंतु येत्या काही दिवसात अध्यादेश प्राप्त होण्याची शक्यता आहे.
- प्रा. डॉ. स्वाती आरागडे, सातारा
विद्यार्थी प्रतीक्षेत
कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आली, मात्र वरिष्ठ महाविद्यालये अद्याप बंदच आहेत. वास्तविक वरिष्ठ महाविद्यालये सर्वात प्रथम सुरू होणे गरजेचे होते. मात्र महाविद्यालये सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आग्रही आहेत. दि. १० फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये ऑफलाईन सुरू होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत अध्यादेश प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत तरी वरिष्ठ महाविद्यालयांचे कामकाज ऑफलाईन सुरू राहणार आहे.
कोट :
महाविद्यालये सुरू करण्याबाबत विद्यापीठ स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.
- जयेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष, मराठा विद्या प्रसारक समाज