सातारा : कोरोनाने प्रत्येक कुटुंबावर आर्थिक संकट आणले आहे. सामान्य कुटुंबांची अवस्थता तर सांगवेना आणि सोसवेना अशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पालक संघाने मार्च २०२१ पासून सातत्याने शाळांनी सेवा तेवढीच फी आकारून पालकांना या संकटकाळात दिलासा द्यावा, अशी अपेक्षा प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
सातारा जिल्हा पालक संघ यांनी मांडलेल्या काही मुद्यांवर जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी शाळेला फीचा ब्रेकअप द्यायला सांगितला होता. तसा लेखी आदेशही शिक्षण विभागाने काढून सर्व खासगी शाळांना ईमेलद्वारे फी कशी आकारता याचा आराखडा मागितला होता. बहुतांश शाळांनी ईमेलद्वारे फीचा ब्रेकअप शिक्षण विभागाला पाठविला आहे.
या काळात शाळांनी स्वत:ची नैतिकता ओळखून स्वत: पालकांशी संवाद साधून फी सवलत आणि येत्या वर्षाचे शैक्षणिक नियोजन आदी गोष्टी करायला हव्या होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे मिळालेल्या या कालावधीचा उपयोग काही शाळांनी पालकांची गळचेपी करण्याकरिताच केला. या कालावधीमध्ये शाळांनी पालकांना पूर्ण दबावात ठेवायचा प्रयत्न केला, काही शाळांनी निकाल राखून ठेवला, पुढील वर्षी प्रवेश देणार नाही असाही पालकांच्यावरती दबाव टाकला.
नवीन शैक्षणिक वर्ष आता जवळ आले असून काही शाळा प्रशासनाने पालकांना युनिफॉर्म, पुस्तके इत्यादी गोष्टी घ्याव्यात म्हणून आदेशवजा पत्र काढले आहे. काही शाळा येत्या वर्षाचीसुद्धा फी भरा म्हणून आग्रह धरीत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन आणि पालक यांनी परस्पर समन्वयातून एकमेकांना पूरक पर्याय काढून पुढं जावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शाळांना आवाहन -
जोपर्यंत मागील वर्षाच्या फीमध्ये कमीत कमी ५० टक्क्यांची सवलत पालकांना देत नाही, तोपर्यंत येत्या शैक्षणिक वर्षाची फी पालकांकडून घेऊ नये.
मागील वर्षी ज्या पालकांकडून ५० टक्केपेक्षा जास्त रक्कम फी स्वरूपात पालकांकडून जमा करून घेण्यात आली आहे, ती रक्कम पालकांना तत्काळ रिफन्ड देण्यात यावी किंवा येणाऱ्या वर्षात अॅडव्हान्स म्हणून जमा दाखवावी.
येत्या शैक्षणिक वर्षासाठी नवीन पीटीए मेंबरची नियुक्ती आॅनलाइन पद्धतीने सर्व पालकांची मीटिंग घेऊन करण्यात यावी.
नवीन पीटीए मेंबरबरोबर मीटिंग घेऊन त्यामध्ये येत्या शैक्षणिक वर्षाची फी सवलत आणि शैक्षणिक धोरण हे ठरविण्यात यावे, तसेच येत्या शैक्षणिक वर्षाचे पूर्ण नियोजन पीटीए मेंबर्सबरोबर बैठक घेऊन करण्यात यावे.
पालकांना आवाहन-
जोपर्यंत शाळा प्रशासन मागील वर्षीच्या फीमध्ये कमीत कमी ५० टक्के सवलतीचा विषय संपवत नाही, तोपर्यंत पालकांनी कोणत्याही परिस्थितीत पेंडिंग फी भरू नये तसेच येत्या शैक्षणिक वर्षाची फीसुद्धा भरू नये.
ज्या पालकांनी मागील वर्षी ५० टक्केपेक्षा जास्त रक्कम म्हणून शाळेकडे जमा केली आहे, त्यांनी ती रक्कम परत मागावी किंवा येणाऱ्या वर्षात अॅडव्हान्स म्हणून जमा करावी, असे लेखी पत्र/ईमेल शाळांना द्यावे आणि त्याची एक कॉपी ई-मेलद्वारे सातारा जिल्हा पालक संघ यांना पाठवावी.
प्रत्येक पालकाने शाळा प्रशासनाकडे नवीन पीटीए मेंबरच्या नियुक्तीबद्दल आग्रह धरावा. नवीन नियुक्त केलेल्या पीटीए मेंबर्सना पालकांनी वेळोवेळी सूचना देऊन त्यांच्या अडचणी शाळेसमोर ठेवण्यास सांगणे.
कोट :
पालक आणि शाळा यांच्यात वर्षानुवर्षे उत्तम संबंध प्रस्थापित झाले आहेत. कोविडने अनेकांना आर्थिक संकटात टाकले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पालकांबरोबर चर्चा करून शाळांनी फीचे धोरण ठरवून घ्यावे. शाळांच्या आणि पालकांच्या दोन्ही बाजूच्या अडचणी समजून घेऊन तोडगा काढणं हा यावरील उपाय आहे.
- प्रशांत मोदी, जिल्हा पालक संघ, सातारा