वाई तालुक्यात नियमांचे पालन करून शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:12+5:302021-02-05T09:12:12+5:30

वाई : राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात ९ वी ते १२ वी वर्ग चालू केले, तर २७ जानेवारीपासून पाचवी ...

School started in Wai taluka following the rules | वाई तालुक्यात नियमांचे पालन करून शाळा सुरू

वाई तालुक्यात नियमांचे पालन करून शाळा सुरू

वाई : राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात ९ वी ते १२ वी वर्ग चालू केले, तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी शाळा कोरोनाच्या नियमावलींचे पालन करून सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यासह जिल्ह्यात व वाई तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.

कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक असून प्रशासनासह नागरिकांमध्ये समाधान व आशादायक चित्र दिसून येत आहे.

वाई तालुक्यात २३ नोव्हेंबरला नववी ते बारावी शाळा सुरू झाल्या असून, २७ जानेवारीपासून पाचवी ते बारावी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. वाई तालुक्यात ५७ शाळा असून, शासन निर्णयानुसार प्रशासनाने शासनाच्या नियमावलींचे पालन करून शाळा सुरू केल्या आहेत. वाई तालुक्यात नववी ते बारावी एकूण ५१७५ विद्यार्थी असून पाचवी ते आठवी एकूण मिळून १०८१५ विध्यार्थी असून, ७७५७ पालकांनी संमतीपत्र दिले आहेत. तालुका शिक्षण विभाग, तालुक्यातील शाळा व्यवस्थापनाने पूर्वतयारी म्हणून शाळा सॅनिटायझिंग केल्या आहेत. तसेच सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाकडून शिक्षकांची कोरोना तपासणी करून घेतली आहे. आतापर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून सातशे कर्मचाऱ्यांनी कोरोना तपासणी केली असून, त्यापैकी दोन शिक्षक व एक शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे दिले जात होते; परंतु प्रत्यक्षात शाळेत जाण्यास मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता. शाळा नियमांचे पालन करून सुरू केल्या असून, पालकांनी सहकार्य करावे.

(कोट..)

पाचवी ते आठवी शाळा सुरू झाल्या असून, शिक्षण विभाग व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पूर्वतयारी केली आहे. शाळा शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळा एका दिवसाआड भरविली जात आहे. पालकांनी घाबरून न जाता सहकार्य करून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

-सुधीर महामुनी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, वाई.

Web Title: School started in Wai taluka following the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.