शाळा बंदने मुलांसोबत पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:21+5:302021-08-28T04:43:21+5:30
केशव जाधव पुसेगाव : कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारच्या शाळा ...

शाळा बंदने मुलांसोबत पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले
केशव जाधव
पुसेगाव :
कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारच्या शाळा गेल्या सुमारे दीड वर्षापासून बंद आहेत. मात्र, त्याचा मोठा फटका हा शिक्षणक्षेत्रात अध्ययनाचे ऑनलाईन काम करणाऱ्या व देशाची भावी पिढी असलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना बसल्याचे दिसून येत आहे.
२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात सर्वप्रकारच्या शाळा दिवाळीपर्यंत सुरू करण्यास राज्य शासनाने स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरूच आहे. येत्या काही दिवसांत अकरावी ही ऑनलाईन सुरू होत आहे. दीड वर्षापासून हे ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने घरातच अडकून असलेल्या मुलांमध्ये लठ्ठपणा, निद्रेचे बदललेले चक्र, पोटदुखी व डोळ्यांचे आजार, मित्र-मैत्रिणींचा अभाव, वाढलेला चिडचिडेपणा व मुलांचे विविध हट्ट पुरवताना तसेच त्यांच्या आरोग्याची चिंता लागल्याने पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे.
कोरोना संसर्ग प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनातर्फे वेळोवेळी कठोर भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने अद्यापही शाळा, महाविद्यालये सुरू नाहीत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून विद्यार्थी घरीच आहेत. ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढला असून, मोबाईल, संगणक, लॅपटॉप आदीवर तासनतास बसण्याचे व टीव्ही पाहण्याचे प्रमाणही वाढले आहे. एकाच जागेवर बसून क्रिया होत असल्याने शारीरिक हालचाल पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यामुळे लठ्ठपणा, निद्रेचे बदललेले चक्र, चिडचिडेपणाही वाढला आहे. स्क्रीन टाईम वाढल्याने अनेक मुलांच्या डोळ्यावर त्याचा विपरित परिणाम झालेला आहे. अनेक पालकांचे घरूनच ऑनलाईन काम सुरू असून, दिवसभराचे सर्व वेळापत्रक बदलले असून, कामाची वेळ वाढली आहे. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना तसेच लहान मुलांना पुरेसा वेळ देता येत नसल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जात असून, विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.
चौकट...
मित्र-मैत्रिणींशी विविध विषयांवर चर्चा...
पालकांना आपली गरजेची दैनंदिन कामे करत कुटुंबासाठी थोडावेळ काढणे गरजेचे आहे. मुलांना त्यांच्या मित्रांशी ऑनलाईन पद्धतीने संभाषण करायला लावणे तसेच कुटुंबातील व्यक्ती नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींशी विविध विषयांवर चर्चा झाल्यास मानसिक व शारीरिक आरोग्य नक्कीच उत्तम राहील, असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.