जीवित हानी टाळण्यासाठीच शाळेची इमारत उतरविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:13 IST2021-02-18T05:13:36+5:302021-02-18T05:13:36+5:30
सातारा : वाईतील रविवार पेठेत जुन्या इमारतीत भरविण्यात येणारी शाळा धोकादायक झाली आहे. बाम्ह समाजाने नोटीस बजावून तेथील वर्ग ...

जीवित हानी टाळण्यासाठीच शाळेची इमारत उतरविली
सातारा : वाईतील रविवार पेठेत जुन्या इमारतीत भरविण्यात येणारी शाळा धोकादायक झाली आहे. बाम्ह समाजाने नोटीस बजावून तेथील वर्ग बंद केले. यामागे गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे नुकसान होऊ नये व जीवित हानी टाळली जावी हाच हेतू आहे. इमारतीचे पत्रे काढले जात असताना संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी शाळा इमारत पाडल्याचा जो स्टंट केला, तो दिखावा आहे, असा दावा वाई ब्राम्ह समाज संघटनेच्या अध्यक्षा प्रियांका साबळे यांनी केला.
ब्राम्ह समाज संघटनेच्यावतीने बुधवारी साताऱ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत साबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या पुढे म्हणाल्या, वाई येथील ब्राम्ह समाजाची इमारत ही धोकादायक बनल्याने वाई नगरपालिकेने ७ ऑगस्ट २०१९ रोजी नोटीस बजावली होती. ब्राम्ह समाजाने वेळोवेळी संस्थेशी पत्रव्यवहार करून, इमारत धोकादायक झाली असून, आपण गर्ल्स हायस्कूलचे दोन वर्ग व शालेय साहित्य इतरत्र हलवावे, अशा लेखी सूचना केल्या. यासंदर्भात संस्थेशी पुन्हा पत्रव्यवहार करून शाळा मुख्याध्यापकांची सुद्धा भेट घेतली. तसेच ब्राम्ह समाजाच्या कार्यवृत्तांत अहवालामध्येही शिक्षण विभाग, वाई पोलीस ठाणे, वाई नगरपालिका यांना पत्र देऊन वर्ग भरविण्यास मनाई करावी, अशा मंजूर ठरावाची नोंद आहे.
ब्राम्ह समाजाने धोकादायक इमारतीचा पत्रा काढला असून धोकादायक भाग टप्प्या-टप्प्याने काढण्याची तयारी केली आहे. गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे नुकसान होऊ नये व जीवित हानी टाळली जावी हा आमचा हेतू आहे. इमारतीचे पत्रे काढले जात असताना संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी शाळा इमारत पाडल्याचा जो स्टंट केला, तो दिखावा आहे. संस्थेची वाई शहरात इतरत्र इमारत असतानाही काही विशिष्ट हेतूने तेथे जाणीवपूर्वक वर्ग भरविले जातात. यामागे असणाऱ्या हालचालीचा आम्ही शोध घेत असून यासंदर्भात आमची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. ब्राम्ह समाजाने इमारत उतरविण्याचे काम नियमानुसारच केले आहे, त्याचा कोणी गैरअर्थ लावू नये, असा इशारा प्रियांका साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.