शाळकरी मुलाचे अपहरण!

By Admin | Updated: July 7, 2014 23:03 IST2014-07-07T23:01:43+5:302014-07-07T23:03:49+5:30

विहे घाटात मारहाण : रिक्षाचालकासह दोघांनी पळविल्याचा संशय

School boy kidnapped! | शाळकरी मुलाचे अपहरण!

शाळकरी मुलाचे अपहरण!

कऱ्हाड : शहरातील एका विद्यालयामध्ये नववीत शिक्षण घेणाऱ्या मुलाचे दोघांनी अपहरण केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला. संबंधित मुलाला अपहरणकर्त्यांनी विहे घाटातील झाडीमध्ये नेले होते. मात्र, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून तो मुलगा दुपारी कऱ्हाडातील आपल्या नातेवाइकांच्या घरी आल्याचे सांगितले जात आहे. संबंधित मुलाकडे पोलीस रात्री उशिरापर्यंत घटनेबाबत चौकशी करीत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा नाका परिसरात राहणाऱ्या एका शिक्षकाचा मुलगा सोमवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी नाक्यावर आला. तेथे तो एका रिक्षामध्ये बसला. या रिक्षामध्ये चालकासह अन्य एक व्यक्ती होती. या व्यक्तींनी मुलाला शाळेकडे न नेता कऱ्हाड-पाटण मार्गाने विहे घाटात नेले. घाटामध्ये असलेल्या झाडीत नेऊन त्यांनी त्या मुलाला एका महिलेच्या ताब्यात दिले. मुलाला मारहाण करून त्याच्याकडे मोबाईल क्रमांकाची विचारणा करण्यात आली. त्यानंतर रिक्षाचालक व त्याच्यासोबत असलेली व्यक्ती तेथून निघुन गेली. बराच वेळ मुलगा महिलेच्या ताब्यात होता. काही वेळानंतर मुलाने त्या महिलेच्या डोक्यात दगड मारून तेथून पळ काढला. रस्त्यावर येऊन तो एका वाहनाने कऱ्हाडातील आपल्या नातेवाइकांकडे गेला. नातेवाइकांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी मुलासह पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली. मुलाकडून समजलेल्या घटनाक्रमानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणतीही ठोस माहिती हाती लागली नव्हती. तसेच याबाबतचा गुन्हाही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला नव्हता. (प्रतिनिधी)

Web Title: School boy kidnapped!