फोनवर वादावादी करू नको सांगितल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:47+5:302021-05-23T04:39:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : फोनवर वादावादी करू नका, हे सांगणे एका ट्रकचालकाच्या अंगलट आले असून, दोघांनी त्यांच्या ...

फोनवर वादावादी करू नको सांगितल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : फोनवर वादावादी करू नका, हे सांगणे एका ट्रकचालकाच्या अंगलट आले असून, दोघांनी त्यांच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना राजलक्ष्मी टॉकीजसमोर दि. १८ रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात जहीर मोहम्मद शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) व त्याचा भाचा नवाज नुरा खान (रा. करंजे पेठ सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिरोज उस्मान खान (वय ४२, रा. शनिवार पेठ सातारा) हे ट्रकचालक असून, दि. १८ रोजी रात्री साडेनऊ वाजता ते राजलक्ष्मी टॉकीज समोरील रस्त्याकडेला ट्रक लावून घरी निघाले होते. त्यावेळी नवाज खान हा फोनवर कोणाशी तरी वादावादी करत होता. त्यावेळी फिरोज खान यांनी त्याला वादावादी करू नको, असे सांगितले. या कारणावरून चिडून जाऊन नवाज शेख याने रस्त्याच्या कडेला पडलेली काचेची बाटली हातात घेऊन फिरोज खान यांच्या डोक्यात मारली. त्यानंतर जहीर शेख याने त्याच बाटलीने फिरोज खान यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांचा भाऊ मुस्ताक खान हा भांडणे सोडण्यास आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. काचेची बाटली डोक्यात, कपाळावर आणि तोंडावर मारल्यामुळे फिरोज खान गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी जहीर शेख आणि नवाज खान या दोघांवर गुन्हा दाखल केला.
सहायक पोलीस फौजदार अजित जगदाळे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.