म्हणे, ज्यानं पिस्तूलं रोखलं, त्याचा जावई पाहुणचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:11+5:302021-09-03T04:41:11+5:30
सातारा : एकोणीस वर्षांपूर्वी मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून निवृत्त अधिकारी असलेल्या सासऱ्याने जावयावर चक्क पिस्तूल रोखले. त्याच ...

म्हणे, ज्यानं पिस्तूलं रोखलं, त्याचा जावई पाहुणचार!
सातारा : एकोणीस वर्षांपूर्वी मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून निवृत्त अधिकारी असलेल्या सासऱ्याने जावयावर चक्क पिस्तूल रोखले. त्याच सासऱ्याचा म्हणे पोलिसांनी जावई पाहुणचार केलाय. त्यांना पोलीस ठाण्यातून सुखरूप घरी पोहोचवले. एवढेच नव्हे, तर रात्रभर दोन पोलीस म्हणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात केले होते. या साऱ्या प्रकाराची नातीनेच पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केलीय.
सासऱ्याच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून जावई आणि त्यांची मुलगी तक्रार देण्यासाठी जेव्हा पोलीस ठाण्यात पोहोचली. तेव्हा घडलेला सारा थरार त्यांनी पोलिसांना सांगितला. निवृत्त अधिकारी असलेल्या सासऱ्याने हातात पिस्तूल घेऊन कसे धमकावले, याचे शूटिंग त्यांनी पोलिसांनाही दाखवले. तेव्हा पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच त्यांना पिटाळून लावले. ही घटना घडून तब्बल २३ तास उलटले होते. असे असतानाही पोलिसांना यात गांभीर्य वाटले नाही. सरतेशेवटी धन्यकुमार माने आणि त्यांची मुलगी गृहमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे गेल्यानंतर मग पोलिसांना जाग आली. गृहमंत्र्यांचा आदेश म्हटल्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून घेण्याशिवाय पोलिसांजवळ पर्याय नव्हता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सासऱ्याला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर इतर आरोपींसारखी त्याला वागणूक मिळाली नसल्याचे धन्यकुमार माने आणि त्यांची मुलगी आरोप करतेय. त्या दिवशी सासऱ्यांच्या घरासमोरील मंदिरात रात्रभर दोन पोलीस कर्मचारी झोपले होते. म्हणजे सासऱ्याला कागदोपत्री अटक दाखवून घरी झोपण्यास परवानगी दिल्याची शंका नातीने अधीक्षकांना दिलेल्या निवदेनात उपस्थित केलीय. इतकेच नव्हे तर याची सत्यता तपासण्यासाठी ज्या ठिकाणी पोलीस झोपले होते. त्या ठिकाणी असलेल्या मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासावे, अशी मागणीही त्यांनी केलीय.
चाैकट :
पुरुष नको... महिला तपासी अधिकारी नेमा...
या प्रकरणात सध्या नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास नसून, महिला पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करावी, तरच यातील वस्तुस्थिती समोेर येणार असल्याचे नातीने म्हटले आहे.
आजोबांकडे असलेल्या पिस्तुलाचा परवाना कायमचा रद्द करावा, अशी मागणीही तिने केली आहे.